परवानाधारकांची संख्या अवघी २१३८; रस्ते, पदपथांवर अतिक्रमण

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाची गाडी येण्याआधीच मिळणारी खबर, गाडी दिसताच सामान लपवून पळत सुटणारे फेरीवाले आणि गाडी जाताच पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापून जाणारे रस्ते.. नवी मुंबईतील कारवाईच्या या फार्समुळे केवळ २,१३८ फेरीवाल्यांनाच पालिकेने परवाना दिला असताना शहरात तब्बल हजारो विनापरवाना फेरीवाले विनासायास व्यवसाय करत आहेत. फेरीवाल्यांचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केलेले असताना महिन्याकाठी कोटय़वधींची हप्तेवसुली होत असल्याचा आरोप फेरीवाला संघटना करत आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, तुर्भेतील पदपथ आणि रस्ते मोकळा श्वास घेत होते, मात्र त्यांची बदली झाल्यापासून या पदपथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसवण्यास सुरुवात केली. अतिक्रमण विभागाची कारवाईही मंदावल्याने आता हे रस्ते फेरीवाल्यांच्या गर्दीने घुसमटू लागले आहेत. तर घणसोली व दिघा येथील फेरीवाल्यांना परवाना दिलेला नाही. घणसोलीमध्ये रविवारच्या आठवडा बाजारात फेरीवाल्यांची भाऊगर्दीच असते. दिघा येथेही काही फेरीवाले आहेत.

मुंढे यांच्या काळात वाशी सेक्टर-९ येथील रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून त्यांना वाशी डेपोशेजारी बसवण्यात आले होते. आता या ठिकाणीच फेरीवाल्यांची गर्दी झाली आहे. पालिकेने काही फेरीवाल्यांना वाशी डेपोजवळील मंडईत बसण्यासाठी परवाने दिले आहेत, परंतु त्या ठिकाणी विक्री होत नाही, म्हणून या फेरीवाल्यांनी वाशी सेक्टर नऊमधील रस्ता काबीज केला आहे.

शहरात अनेक रस्त्यांच्या कडेला गॅस सिलिंडर ठेवून खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्याचे नऊ  दिवस कारवाई केली, परंतु आता सर्वच प्रभागांत फेरीवाल्यांची गर्दी झाली आहे.

आठवडा बाजारामुळे समस्या गंभीर

शहरात विविध ठिकाणी आठवडा बाजार भरतो. घणसोली, तुर्भे, शिरवणे येथील आठवडा बाजार प्रसिद्ध आहेत. या बाजारांत मानखुर्द, गोवंडी, चेंबूर परिसरातून फेरीवाले येतात. आठवडा बाजारात संपल्यावर ते रस्त्यांवर बसून विक्री करतात. त्यामुळे आठवडा बाजारांमुळे फेरीवाले वाढतच आहेत.

 अधिकारी ‘वसुली’ करत असून पालिकेचा महसूल बुडवत आहेत. फेरीवाल्यांना परवाना दिला व त्यांना योग्य ठिकाणी जागा देऊन महसूल गोळा केला तर पालिकेला कोटय़वधींचा महसूल मिळेल. अन्यथा कोटय़वधींचा खर्च करूनही फेरीवाल्यांचा प्रश्न जेसे थे राहील.

– प्रफुल्ल म्हात्रे, अध्यक्ष, नवी मुंबई फेरीवाला संघटना

शहरात फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार असून परवानाधारक व विनापरवाना फेरीवाल्यांनी आपला भ्रमणध्वनीक्रमांक आधारकार्डशी संलग्न करून घ्यावा. विविध आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– तृप्ती सांडभोर, उपायुक्त, परवाना विभाग