पालिकेच्या दुर्लक्षामुळे २१ किलोमीटर रस्ते विकसित करणार

नवी मुंबई औद्योगिक वसाहतीतील मालमत्ताकराची वसुली नवी मुंबई पालिका करत असतानाही पायाभूत सुविध पुरवत नसल्याने ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे ‘एमआयडीसी’ने येथील २१ किलोमीटर रस्त्यांच्या विकास करण्याचे ठरविले असून यासाठी २४० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही कामे सुरूही करण्यात आली आहेत. मात्र पावसामुळे आता बंद असून पुढील पावसाळ्यात खड्डेमुक्त प्रवास शक्य असल्याचा दावा ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

रबाले आणि डी विभागातील रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.  १७५ कोटींपेक्षा जास्त मालमत्ताकर या वसाहतीतून नवी मुंबई महापालिकेला मिळतो. तरीही या ठिकाणच्या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. पावसामुळे तर ‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते’ अशी अवस्था झाली आहे. यामुळे येथील कारखानदार, कामागारांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुरुवातीच्या काळात वसाहतीत अनेक ठिकाणी पक्के रस्ते पालिकेने केले. मात्र काही वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा कारखानदारांसह ‘एमआयडीसी’चा आरोप आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही कामे होत नसल्याने औद्योगिक विकास महामंडळाने २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे.

या संदर्भात पालिकेच्या शहर अभियंता यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही. आद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता मारोती कलकुटी यांनी रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने ‘एमआयडीसी’ने हे काम हाती घेतली आहे. पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

नवी मुंबई पालिकेने सुरुवातीला काही ठिकाणी रस्ते बांधले. मात्र त्याची देखभाल दुरुस्तीही वेळेवर होत नाही. एवढेच नव्हे तर कचराही उचलला जात नाही. आशियातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा असलेल्या या ठिकाणी देश विदेशातील अनेक लोकांची ये-जा असते. मात्र पायाभूत सुविधा पाहून नाचक्की होत आहे.

– के.आर.गोपी, अध्यक्ष, ‘टीटीसी’ एमआयडीसी असोशिएशन