१५६ विद्यार्थी उपचारानंतर घरी; आहार पुरवठादारावर कारवाईची मागणी
पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी शालेय पोषण आहारातून २५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यातील १५६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ९८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मध्यान्न भोजनानंतर अचानक मनीषा ही सातवीची विद्यार्थिनी चक्कर येऊन खाली पडली. काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांनी चक्कर येत असल्याची तक्रार केल्यानंतर २५४ विद्यार्थ्यांना ताबडतोब खासगी वाहनातून तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधेची गंभीर लक्षणे दिसून आलेल्या एकूण ९८ विद्यार्थ्यांमध्ये ४३ विद्यार्थी तर ५५ विद्यार्थ्यांनींचा समावेश आहे. साधारण विषबाधेची लक्षणे दिसून आलेल्या १५६ विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सायंकाळी ७ पर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली आल्याचे डॉक्टर तरसे आणि डॉ. खंडागळे यांनी सांगितले. इस्कॉन या संस्थेकडून शाळेला मध्यान्न भोजनचा पुरवठा करण्यात येतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.