नवी मुंबईत पहिली मात्रा दिलेल्यांची संख्या ५८ टक्के

नवी मुंबई : तिसऱ्या लाटेपूर्वी किमान ज्येष्ठ नागरिकांना लसकवच देण्याचे नियोजन केलेल्या नवी मुंबई महापालिकेला आतापर्यंत ५० टक्के ज्येष्ठांनाच दोन्ही मात्रा देणे शक्य झाले आहे. लस तुटवडा असल्याने मोफत लसीकरण विस्कळीत सुरू आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने किमान ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना लस देता आली आहे.

शहरात लसीकरणास पात्र लोकसंख्या ११ लाखांपर्यंत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही १ लाख ५० हजारांपर्यंत असून त्यापैकी ७२ हजार ९७२ जणांना दोन्ही लसमात्रा देण्यात आल्या आहेत. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही सर्वात जास्त करोना मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचेच झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यू १९०६ असून त्यापैकी १०५९ ज्येष्ठ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू  झाला आहे. त्यामुळे प्राधान्याने त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत करोनाची दैनंदिन सर्वाधिक रुग्णसंख्या १४४१ पर्यंत गेली आहे. महापालिकेने त्या तुलनेत आरोग्य सुविधांत वाढ केली आहे. मात्र तिसऱ्या लाटेत अपेक्षेपेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळल्यास प्रशासनावर ताण येणार आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या २५ हजारांच्या वर गेल्यास पालिकेवर प्रचंड ताण येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

आतापर्यंत ५८ टक्के नागरिकांना किमान एकमात्रा देण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना तिसऱ्या लाटेपूर्वी किमान एकमात्रा तरी देण्याचे पालिकेचे नियोजन आहे. मात्र लस मिळत नसल्याने पालिका प्रशासनाला उपलब्ध लशींनुसार केवळ उद्याचे नियोजन करता येत आहे.

करोनामुळे ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

  • ६१ ते ७० वयोगट : ५४०
  • ७१ ते ८० वयोगट : ३६९
  • ८१ ते ९० वयोगट : १३६
  • ९१ ते १०० वयोगट : १४

शहरात अंदाजे १.५० लाख ज्येष्ठ नागरिकांची संख्या असून त्यातील ५८ टक्के नागरिकांना एकमात्रा तर ५० टक्के ज्येष्ठांना दोन्ही लसमात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत जरी ज्येष्ठ नागरिक बाधित झाले तरी मृत्यूचे प्रमाण लस घेतल्यांचे कमी राहील.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका