प्रसरण सांध्याची पट्टी तुटल्यामुळे दुचाकींची चाके अडकून अपघात

शीव-पनवेल महामार्गावर वाशी येथून पामबीच मार्गावरून जाणाऱ्या पुलाच्या प्रसरण सांध्यातील पट्टय़ा तुटल्याने हे ठिकाण धोकादायक बनले आहे. येथे वारंवार अपघात होत आहेत. येथे नुकत्याच झालेल्या दोन अपघातांत जुईनगर येथील दोन तरुण जखमी झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलाची दुरुस्ती सध्या सुरू आहे. नेरुळमार्गे वाशीकडे जाणाऱ्या शीव-पनवेल मार्गावर सानपाडा स्थानकाबाहेरील उड्डाणपूल ओलांडल्यावर एक रस्ता उजवीकडे सानपाडय़ाहून पामबीचला जोडला आहे. याच मार्गावरून मानखुर्दहून येताना डावीकडून पामबीचला जाता येते. तेथील पुलाच्या प्रसरण सांध्याच्या ठिकाणी लावलेल्या पट्टय़ा तुटल्या आहेत. तिथे टाकलेला लोखंडी पाइपही गंजला आहे. पट्टय़ा तुटल्यामुळे प्रसरण सांध्यात फट पडली असून दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांचे टायर त्यात अडकतात व अपघात होतात. याच ठिकाणी जुईनगरमधील सुयोग सोसायटीतील गणेश पुजारी आणि जयेश सोळंकी जखमी झाले.  सोमवारी रात्रीही दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याचा इथे अपघात झाला.

भररस्त्यात लोखंडी पट्टय़ा वर-खाली झाल्या आहेत. त्यामुळे तोल जाऊन माझा अपघात झाला. मागून भरधाव वाहन येत नव्हते, त्यामुळे जीव वाचला. पायाला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी.

– गणेश पुजारी,

सुयोग सोसायटी, जुईनगर

प्रवाशांना जीव गमावावा लागण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करून लोखंडी पट्टय़ा पूर्ववत कराव्यात. खाडी पुलावर सुरू असलेल्या कामामुळे जड वाहने वळवण्यात आली असली तरी हलकी वाहने मोठय़ा प्रमाणात या मार्गावरून जातात. त्यामुळे या धोकादायक ठिकाणाची तात्काळ दुरुस्ती करावी.

– किशोर जाधव, रहिवासी