नवी मुंबई : टाळेबंदीनंतर नवी मुंबईत भुरटे चोर सक्रिय झाले असून वाहनांचे सुटे भाग ते चोरी करीत आहेत. गुरुवारी पहाटे एका कारची चारही चाके चोरीला गेली आहेत. तर दोन दिवसांपूर्वी एका कारचे आरशेही चोरी झाले आहेत.

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर नवी मुंबईत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यात साखळी चोरीसह घरफोडीचे प्रमाण वाढले आहे.सायबर गुन्हे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहेत. त्यात आता या भुरट्या  चोरांची भर पडली आहे. रिक्षा,कार, दुचाकी या वाहनांचे सुटे भाग चोरी होत आहेत. चाके, आरशे, वायपर आदी साहित्य चोरीला जात आहे.

अगदी कचराकुंड्या,  तावदानचे गजही चोरीला जात आहेत. गुरवारी रात्री वाशी सेक्टर ९ येथील सुमेश जॉर्ज यांच्या मोटारीची चारही चाके चोरीला गली आहेत. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हे भुरटे चोर मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पझेरो अशा  आलिशान मोटारींची चाके चोरी करीत असतात. मोटारींच्या सुटे भागांची बाजारात ती विक्री करणे त्यांना सोपे असते, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली. विशेष म्हणजे याबाबत चोरीनंतर लोक फारसे तक्रार  करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी तक्रारी केल्यास आशा टोळ्यांचा शोध घेता येतो.