तुडतुडा, थीप किडय़ाचा प्रादुर्भाव आणि वातावरणाचाही फटका

तुडतुडा आणि थीप या किडय़ांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यंदा अंबा फळावर काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा उत्पादनावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळेही आंब्याला फटका बसून ओखी वादळातून उभारी घेत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण, धुके, अवेळी पाऊस यांचा सामना आंब्याला करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणजे गतवर्षीपेक्षा मुंबईत आंब्याची मार्च महिन्याच्या मध्यावर होणारी आवक घटली आहे.

एपीएमसी फळ बाजारातील आंब्याची आवक गतवर्षीच्या मार्च महिन्यापेक्षा यंदा २० हजार ते ३० हजार पेटय़ांनी घटली आहे. सामान्यपणे गुढीपाडव्यानंतरच हापूसची मागणी वाढते. त्यामुळे यंदा आंब्याच्या दरावर याचा परिणाम होणार आहे. अांब्याच्या किमतीतील बदलाचा अंदाज पुढील आठवडय़ात येईल, असे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

चांगला नफा मिळवून देणारे फळ म्हणून हापूस आंब्याकडे पाहिले जाते, मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे अलीकडच्या काळात हापूस उत्पादक संकटात सापडू लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये ओखी वादळामुळे हापूस पीक धोक्यात आले होते. साधारणपणे त्याच सुमारास मोहोर येतो आणि फळधारणा सुरू होते. ओखीमुळे आलेल्या पावसाने आंबा बागायदारांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. मोहोर गळून पडला होता आणि पिकाला पालवी फुटली होती. त्या पालवीला फळधारणा होण्यास तीन महिने लागले. विलंबाने आलेली फळे तोडणीला आली असताना आता पुन्हा ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू झाला आहे.

झाले काय?

सततच्या बदलत्या वातावरणामुळे फळांना जिवाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. तुडतुडा आणि थीप किडय़ांच्या प्रादुर्भावामुळे हापूसला काळे डाग पडत आहेत. सावंतवाडीमध्ये २५ ते ३० टक्के पिकाला या रोगाची लागण झाली आहे, असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आंबा बागायतदारांना १० ते १४ वेळा औषध फवारणी करावी लागत आहे. राजापूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. येथील बागायतदार मोठय़ा प्रमाणात रासायनिक खते वापरत असल्याने बदलत्या हवामानाचा फटका येथील पिकाला जास्त प्रमाणात बसत आहे. तोडणी १५ दिवसांवर आलेल्या आंब्याला काळे डाग पडत असून त्यामुळे आंबे खराब होत आहेत. या ठिकाणी काही भागांत उत्पादनात ६० टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. बदलत्या हवामानामुळे जास्त प्रमाणात कीटकनाशक फवारणी करावी लागत होती. एवढे करूनही आता हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा आमचे उत्पादन ७० टक्के घटले आहे.

– विश्वनाथ नाईक, शेतकरी, सावंतवाडी

कधी पाऊस, कधी मळभ, कधी अतिउष्ण हवामान, कडक ऊन यामुळे हापूसला तुडतुडा कीटकांची लागण झाली आहे. त्यामुळे फळांवर काळे डाग पडत आहेत. याचा उत्पादनावर तर परिणाम होत आहेच, शिवाय फळाचा दर्जा देखील खालावला आहे.

– नारायण साळगावकर, शेतकरी, वेंगुर्ले