ज्या देशाच्या महिला घरातून बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभ्या राहतील त्या देशाचा विकास होईल, असे मत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सीबीडी येथे व्यक्त केले. अर्बन हाटमध्ये इरा फॉर वुमन प्रस्तुत आर्ट, क्राफ्ट अ‍ॅण्ड फूड फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नवी मुंबईत प्रथमच महिलांनी महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून यातून ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळाला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी नवी मुंबईतील महिलांनी बाईक रॅली काढली.

या उद्घाटनप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, समाजसेविका वर्षां तावडे उपस्थित होत्या. यावेळी समाजसेविका वर्षां तावडे म्हणल्या की, महिला आता चुलीपुरत्या मर्यादित न राहता देश चालवायला लागल्या असून देश प्रगतिपथावर आहे.

महिलांनी आपली संस्कृती व सभ्यता सोडू नये, असे आवाहन सोनाली कुलकर्णी यांनी केले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी सरकारी कार्यालये तसेच मॉलमध्ये जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.