नवी मुंबई : रुग्ण वेळेत दाखल करून न घेतल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने वाशीतील फोर्टिस रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी  घडली.  सुरेश चव्हाण (वय ४८) यांच्या छातीत दुखू लागल्याने मंगळवारी सकाळी त्यांना फोर्टिस रुग्णालयात आणले. मात्र, खाट उपलब्ध नसल्याचे कारण देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना अन्य ठिकाणी नेण्याची सूचना केली. यावर नातेवाईकांनी रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्याची विनंती केली. त्याकडे डॉक्टरांनी लक्ष न दिल्याने मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील काचेच्या तावदानांची तोडफोड केली. रुग्णालयातील डॉक्टरांकडून किमान माणुसकीची वागणूक अपेक्षित असते; परंतु फोर्टिसमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला थेट बाहेरच जाण्यास सांगितल्याचे मृताचे नातेवाईक संतोष जाधव यांनी सांगितले.

मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात भरतीची चौकशी केली असता त्यांना आयसीयू बेड उपलब्ध नसल्याची माहिती दिली गेली. पुढची प्रक्रिया समजावत असताना रुग्ण कोसळला. त्याच्यावर तातडीने कृत्रिम श्वसन यंत्रणेद्वारे प्राणवायू सुरू करण्यात आला; परंतु त्यादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यात काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आल्याची माहिती ‘फोर्टिस’च्या प्रतिनिधीने दिली.