सिडकोची बिघडलेली घडी आणि प्रतिमा पूर्वपदावर यावी यासाठी अनेक अद्ययावत आणि आधुनिक कार्यप्रणालींचा पुरस्कार करणारे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांना सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रणेची गेल्या दोन वर्षांत कठोर अंमलबजावणी करता आलेली नाही. त्यामुळे सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयात ‘आओ जाओ घर हमारा’ असे वातावरण असून, तळमजल्यावरील बायोमेट्रिक यंत्रणा अनेक महिने धूळ खात पडली आहे. सिडको कर्मचाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे ही कार्यप्रणाली बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे समजते.
सिडको राज्यातील एक श्रीमंत महामंडळ असल्याने या महामंडळात तेवढाच भ्रष्टाचार आणि अनियमितता बोकाळली आहे. त्यामुळे या महामंडळाच्या कारभाराची लक्तरे अनेक वेळा राज्याच्या विधानसभेत वेशीवर टांगली गेली आहेत. महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प मार्गी लागावा आणि सिडकोची वाईट प्रतिमा सुधारण्यात यावी, यासाठी राज्य सरकारने स्वच्छ प्रतिमेचे तत्कालीन विक्रीकर आयुक्त संजय भाटिया यांच्यावर या महामंडळाची जबाबदारी सोपविली.
आपली सहकारी म्हणून तसाच नावलौकिक असलेल्या व्ही. राधा यांच्यासाठी भाटिया यांनी शासनाकडे आग्रह धरला. शासनानेही त्यांची मागणी पूर्ण करताना राधा यांच्यावर सहव्यवस्थापकीय संचालिका म्हणून पदभार सोपविला. या अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छता मोहीम हाती घेतली असून सिडकोत बोकाळलेला भ्रष्टाचार काही अंशी कमी केला आहे. त्याचबरोबर कर्मचारी-अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ड्रेस कोडही नेमून दिला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची अचूक वेळ नोंदविण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या बायोमेट्रिक यंत्रणेच्या वापरासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या यंत्रणेवर कायमचे खोके बसवून त्याला अडगळीत टाकण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी एका मंदिराच्या भूखंडाची अनामत रक्कम भरण्यास गेलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना रायगड भवन ते सिडको भवन असा द्रविडी प्राणायाम करण्यास सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडले. काही अधिकाऱ्यांनी नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून दांडी मारली होती, तर अन्य अधिकारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे केवळ डिमांड ड्राफ्ट जमा करण्यास या वयोवृद्ध नागरिकांना संध्याकाळचे पाच वाजले. त्यात सामाजिक सेवा विभागाच्या एका अधिकाऱ्याने स्वखर्चाने या ज्येष्ठांना मदत केल्याने त्यांचे काम झाले.
सिडकोत कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे, मात्र त्यामुळे ‘कधीही या आणि कधीही जा’ अशी सवलत मिळत नाही. कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी काम करीत नसल्याचा आरोप काही कर्मचारीच करीत आहेत. या पदाधिकाऱ्यांना त्यांचा विभाग कोणता आहे, याचीदेखील कल्पना नसल्याची उपरोधिक टीका केली जाते. माजी व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्या काळात ही यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यानंतर ती गेली दोन वर्षे धूळ खात पडली आहे.

९०० कर्मचाऱ्यांचा तुटवडा
सिडकोतील कर्मचाऱ्यांचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यात कोणत्या विभागाला किती कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे त्याची चाचपणी करण्यात आली असून, विभाग अधिकाऱ्यांकडून आवश्यक कर्मचारी व अधिकाऱ्यांची यादी मागविण्यात आली आहे. सिडकोत सध्या तेराशे कर्मचारी आहेत. या ठिकाणी २ हजार २०० कर्मचाऱ्यांची शासन मंजुरी आहे. त्यामुळे ९०० कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असून लवकरात लवकर ही भरती करण्यात यावी, अशी कामगार संघटनेची मागणी आहे. याबाबत दोन महिन्यांत निर्णय होणार आहे.

यंत्रणा सुरू राहावी, असे वाटते -कार्मिक व्यवस्थापक
बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे काम सिस्टीम व्यवस्थापकाचे आहे. त्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती त्या विभागाने करावी असे अभिप्रेत आहे. ही यंत्रणा सध्या नादुरुस्त आहे. ही यंत्रणा सुरू राहावी, असे आम्हाला वाटत असल्याचे कार्मिक व्यवस्थापक टी. एल. परब यांनी सांगितले, तर कामगार संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी हा काम पूर्ण केल्यानंतरच संघटनेच्या कामाला वेळ देत असल्याचा दावा सचिव जे. टी. पाटील यांनी केला.