अभ्यास, जिद्द आणि अपार मेहनतीच्या जोरावर यश

पनवेल : अंधत्वावर मात करून कस्तुरी भोसले या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८३.४० टक्के गुण मिळविले. कस्तुरी हिने सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दहावीच्या विषयांचे पेपर सोडवले. याशिवाय तिने रोज वर्गात जाऊन अभ्यास केला. अभ्यास, जिद्द आणि अपार मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळविले. कस्तुरीने गायनात दोनदा विशारद पदवी संपादन केली आहे. तिच्या या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयात कस्तुरीचे पहिलीपासूनचे शिक्षण झाले. लहानपणी राष्ट्रीय अंध संस्थानने (नॅब) कस्तुरीच्या शैक्षणिक प्रवेशापासून तिला साथ दिली. यात तिच्या कुटुंबाचाही वाटा मोठा आहे. गायनात प्रावीण्य मिळविलेल्या कस्तुरीने पालका, वर्गशिक्षकांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळू शकले, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. गणित विषय कस्तुरीचा आवडीचा आहे.

कस्तुरीचे पेपर लिहिण्यासाठी लेखनिक मिळत नव्हती. पनवेल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर याच विद्यालयात नववीत शिकणाऱ्या प्रज्ञा देवकर हिने तिचे पेपर लिहिण्याची जबाबदारी सांभाळली.

टीना ढवले अपंगातून तालुक्यात सर्वोत्तम

पनवेल तालुक्यामधील ७० विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांनी अपंग गटातून दहावीच्या परीक्षेत विशेष यश मिळविले. बेलवली गावातील टीना दत्तात्रेय ढवळे हिने ८४.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. अस्थिव्यंग असलेली टीना घरापासून दोन किलोमीटर अंतर सायकलवरचा प्रवास करून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात येत होती. टिनाचे वडील एका खासगी कंपनीत वीजतांत्रिकाचे काम करतात.