राज्यात १९ कर्करोग रुग्णालये उभारली जाणार असून, येत्या काही महिन्यांत तीन रुग्णालये उभी राहतील. जनतेच्या आरोग्याबाबत राज्य सरकार जागरूक असून आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. खैरणे एमआयडीसी परिसरात उभारण्यात आलेल्या रिलायन्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

‘मी विविध हॉटेल व अन्य व्यवसायांचे उद्घाटन करताना, त्यांना व्यवसाय उत्तम चालवा म्हणून शुभेच्छा देतो, मात्र हे रुग्णालय असल्याने अशा शुभेच्छा देऊ शकत नाही, त्यामुळे या रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण बरा होऊन बाहेर पडो,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबईत रिलायन्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रूपाने आणखी एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची भर पडली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर खैरणे एमआयडीसीमध्ये असलेले हे रुग्णालय २२५ खाटांचे

आहे. कोकिळाबेन रुग्णालयाच्या ९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर नवी मुंबईत हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अध्यक्ष टीना अंबानी यांनी दिली. या वेळी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख संचालक अनिल अंबानी, ठाण्याचे खासदार राजन विचारे तसेच आरोग्य क्षेत्राशी निगडित तज्ञ उपस्थित होते.