कांदळवनाची कत्तल, मातीच्या भरावाचा पावसाळी मासेमारीला फटका

उरण परिसरात अनेक प्रकल्प तसेच बंदरांच्या उभारणीसाठी कांदळवनांची कत्तल केली जात आहे. येथील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांवरही मातीचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे समुद्रातून थेट खाडीत येणारी मासळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने मिळेनाशी होऊ लागली आहे. पावसाळ्यात मिळणारी अनेक प्रकारची मासळी यावर्षी स्थानिक मासेमारांच्या जाळ्यात न आल्याने  संकट येऊन कोसळले आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटूंबातील उत्पन्नावरही झाला आहे.

उरण तालुका हा संपूर्णपणे खाडीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. अरबी समुद्रातून या किनाऱ्यावरील खाडीत मोठय़ा प्रमाणात लहान मासळी येते. ती आल्यानंतर त्याची वाढ होऊन खाडीतील मासळी तयार होते. ही मासळी समुद्रातील पाण्या पेक्षा अधिक चविष्ट असते त्यामुळे तिला मागणीही आहे. या परिसरात परंपरेने शेती व्यवसाया बरोबरच जोडीला अनेक कुटूंब ही खाडीतील मासळी पकडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात खाडीत येणाऱ्या मासळीचा प्रमाण अधिक असते. त्याचवेळी ताजी कोळंबी, खरबी, तसेच खास महत्वाचे म्हणजे सर्वात चविष्ठ मासा असलेला जिताडाही खाडीच्या मुखावर जाळी लावणाऱ्यांच्या जाळ्यात मिळत असतो.

त्यामुळे या कालावधीत स्थानिक मासेमारांना याचा फायदा होता. आर्थिक फायदा झाल्याने अनेकांना वर्षभराचे उत्पन्नही मिळते. मात्र विकासाच्या नावाने खाडीची मुखे बंद होऊन ती निमुळती होऊ लागल्याने व पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने खाडीतील मासळीवर मोठा परिणाम झाल्याची माहीती बोकडविरा येथील खाडीतील मासेमार पांडूरंग पाटील यांनी दिली. सुरूवातीला काही प्रमाणात मासळी पावसाळ्यात आली मात्र त्यानंतर ज्या प्रमाणात मासळी यावयास हवी होती ती आली नसल्याने यावर्षी संपूर्ण व्यवसायच कोलमडला असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कांदळवन महत्त्वाचे

खाडीतील मासळीही कांदळवनात आपली बीजे टाकतात त्यातील जैववैविधता यामुळे हा मासळी मोठी होते. हेच कांदळवन सध्या नष्ट होत असल्याने या मासळीवर परिणाम होऊ लागला आहे.