शीव-पनवेल महामार्गावरील सिमेंट काँक्रीटीकरणासाठी मे उजाडणार  

शीव-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची या पावसाळ्यापासून सुटका होणार आहे. वाशी ते कळंबोली सर्कल दरम्यान १५ ठिकाणी डांबरीकरणाच्या ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. ४० टक्के काम अद्याप शिल्लक असून मेपर्यंत या मार्गावर विनाअडथळा वाहतूक सुरू होईल असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र या कामामुळे सध्या वाशी, बेलापूर, शिरवणे, कोपरी या ठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे.

२०१०मध्ये कळंबोली सर्कल ते मानखुर्द सिग्नल या २२ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु २०१४ मध्ये कामे अपूर्ण असतानाच या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पावसाळ्यातच रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर सातत्याने या महामार्गावर पावसाळ्यात खड्डय़ांमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. पनवेल ते वाशीपर्यंत अंतर कापण्यासाठी जवळजवळ दोन तास लागत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करीत आंदोलनेही झाली आहेत.

यामुळे यावर्षी ज्या ठिकाणी डांबरीकरण असल्यामुळे दरवर्षी खड्डे पडून रस्त्यांची चाळण होत असे आशा १५ ठिकाणचे साडेचार किलोमीटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या चार महिन्यांपासून हाती घेतले आहे. ६८ कोटी रुपये खर्च करून ही कामे केली जात आहेत. यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी आता पावसाळा नसतानाही वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाशी, बेलापूर, शिरवणे, कोपरी या ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून ४० टक्के काम शिल्लक आहे. मात्र ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे.

४.५ किमी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणारा रस्ता       

६८ कोटी  : कामासाठी येणारा खर्च

६० टक्के  : काम पूर्ण

हस्तांतरणासाठी प्रतीक्षा

बेलापूर ते वाशी टोलनाक्यापर्यंतचा हा रस्ता पालिका हस्तांतरणास तयार आहे. तसा ठरावही महसभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच न्यायप्रविष्ट बाबींसह रस्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव पालिकेला दिला. त्यावर पालिकेने न्यायप्रवीष्ट बाबींसह रस्ता हस्तांतरणास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महामार्ग हस्तांतरणाचा प्रस्ताव सरकारच्या ‘कोर्टात’ गेला आहे.

सध्या सुरू असलेली कामे

महामार्गावर १५ ठिकाणी कामे करण्यात येणार असून सध्या जुना खाडीपूल, वाशी गाव, वाशी उड्डाणपूल संपल्यानंतर, सानपाडा, तुर्भे व शिरवणे उड्डाणपूल, कोपरी व खारघर या ठिकाणी कामे सुरू असून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी या ठिकाणी वाहतूक मंदावत आहे. वाशी गाव, खारघर व नेरुळ परिसरात सायंकाळी आठनंतर रात्री अकरापर्यंत याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे.

शीव-पनवेल महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. शिरवणे येथे एकाच मार्गिकेमधून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे.