ऐरोली सिडको वसाहतीतील रहिवाशांना महावितरणने १५ ते २० हजार रुपयांची बिले पाठवून झटका दिला आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविरोधात ग्राहकांत मोठय़ा प्रमाणात संताप पसरला आहे. मंगळवारी मनसेच्या नवी मुंबई शाखेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर २२ ग्राहकांचे मीटर तपासण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ दिले.

जुलै  महिन्याची बीले पाठविताना तर कंपनीने कहर केला असून सातशे आठशे चौरस फूट घरात राहणाऱ्या रहिवाशांनी थटे पाच ते आठ हजार रुपयांची बिले पाठविले आहेत. ऐरोली सेक्टर १६ येथील छोटयाश्या घरात राहणाऱ्या टिक्कू तन्ना या रहिवाशाला मागील महिन्याचे बील आठ हजार रुपये आले आहे तर याच परिसरात राहणाऱ्या हरिचंद्र पवार यांना पाच हजार रुपयांचा फटका सोसावा लागणार आहे.  बडय़ा सोसायटीतील रहिवाशांना तर कंपनीने गिऱ्हाईक बनविले असून चक्क १६ हजार रुपयांचे बिल हाती दिले आहे. नवी मुंबई शहर मनसेचे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ऐरोली सेक्टर १६ येथील वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. कार्यकर्त्यांचा संताप पाहता महावितरणने पोलिसांना बोलविले. अभियंता महाजन यांनी वाढीव बिलेआलेल्या ग्राहकांचे मीटर तपासले जातील असे आश्वासन  दिले.