नवी मुंबई : गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या महागृहनिर्मितीच्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या ११०० घरांची सिडकोने गुरुवारी यशस्वी सोडत पूर्ण केली.  माजी सनदी अधिकारी सुरेश कुमार यांच्या देखरेखीखाली झालेल्या या सोडतीत अनेकांनी प्रेमदिनाचे औचित्य साधून आपल्या प्रियजनांना घरांची प्रेमळ भेट दिली.

खारघर येथे राहत असलेले संजय काकडे यांना तळोजा येथे घर लागले असून त्यांनी ते आइ-वडिलांना अर्पण केले तर उरण येथे राहणारे व दोन वर्षांपूर्वीच लग्न झालेले सुमित ठाकूर यांनी पत्नी जोत्स्ना यांना भेट दिले.

या सोडतीसाठी ग्राहकांमधील तीन सर्वसामान्य ग्राहकांना पंच म्हणून नेमण्यात आले होते. म्हाडा आणि प्रोबिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या नवीन सॉफ्टवेअरने ही पारदर्शक सोडत काढण्यात आली.

गेल्या वर्षी सिडकोने १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली होती. त्यातील काही प्रकल्पग्रस्त, पत्रकार, माथाडी आणि सिडको कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेली घरे शिल्लक राहिली होती. या घरांना आरक्षणातून मागणी न आल्याने ती या वेळी खुल्या वर्गासाठी विक्री केली गेली आहे. या शिल्लक ११०० घरांनी एकूण ५७ हजार ७०० अर्ज आले होते. त्यातील चार जणांना बाद ठरविण्यात आले आहेत. या अर्जातून सर्व घरांची सोडत  काढण्यात आली. आता एकही घर या योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेले नाही. घर मिळालेल्या ग्राहकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अथवा पैसे न भरल्यास त्यांचे घर रद्द होऊन त्यांच्या जागी गुरुवारी काढण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना संधी दिली जाणार आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमधील ११ ठिकाणी ही ११०० घरे आहेत. गुरुवारी असलेल्या प्रेमदिनाच्या दिवशी अनेक ग्राहकांनी आपल्या प्रियजनाला ही घरांची अनोखी भेट दिली. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सिडकोच्या मुख्यालयात झालेल्या या सोडतीसाठी अनेक ग्राहक आपले नशीब अजमावण्यासाठी आले होते. यातील पाच ग्राहकांचा सिडकोच्या वतीने प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

दुर्बळ घटकांसाठी ७३ घरे

आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी तळोजा येथे ३९ व द्रोणागिरी येथे ३४ सदनिका आहेत, तर अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे ६५०, खारघर ५९, कळंबोली ५३, घणसोली ४३ आणि द्रोणागिरी २२२ सदनिका भाग्यवंत ग्राहकांना मिळाल्या आहेत.