सहा वर्षांत हॉटेल आरक्षणांपलीकडे उल्लेखनीय कामगिरी नाही

राज्यातील पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती करणे या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व सिडकोने जानेवारी २०१२मध्ये स्थापन केलेली ‘महाटुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनी बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या सहा वर्षांत कंपनी पर्यटन क्षेत्रात काहीही कामगिरी करू शकलेली नाही. कंपनीचा लाभ सिडकोच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही झालेला नाही. सिडकोतील कर्मचाऱ्यांना तर अशी काही सिडकोची कंपनी आहे हेच माहीत नाही.

विमानतळ, मेट्रो, रेल्वे, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आणि आंतरराष्ट्रीय दूतावाससारखे मोठे प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोला सहा वर्षांपूर्वी पर्यटन प्रकल्प उभारण्याची लहर आली होती. त्यासाठी कंपनी सचिवांच्या नेतृत्वाखाली महाटुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापनादेखील करण्यात आली. ही कंपनी काही अधिकाऱ्यांच्या प्रेमाखातर स्थापन करण्यात आल्याची चर्चा होती. गृहनिर्मिती आणि औद्योगिक विकासाचे ध्येय ठेवून स्थापन करण्यात आलेल्या सिडकोला पर्यटनाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याची खुमखुमी आल्याने सिडकोच्या वार्षिक खर्चातील कोटय़वधी रुपये या कंपनीकडे वर्ग केले जात होते. लोणावळा, खंडाळा, गणपतीपुळे, बंगळूरु, पुरी यासारख्या पर्यटनस्थळांवर सिडकोचा कंपनी सचिव विभाग आरक्षण करत असे. काही आरक्षण तर कंपनी सचिव प्रदीप रथ स्वत: करून देत होते. त्याचा फायदा सिडकोतील काही मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे बोलले जात होते.

आरक्षणाव्यतिरिक्त या कंपनीने गेल्या सहा वर्षांत काहीच प्रगती केली नाही. त्यामुळे ही कंपनी कोणासाठी स्थापन करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाटलीबंद पाणी आणि खासगी फाम्र्स..

महाटुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना करताना, कृषी व आरोग्य पर्यटनस्थळांना भेटी देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्थानिकांना रोजगार मिळेल असे गाजरदेखील दाखण्यिात आले होते. ही कंपनी मध्यंतरी बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करीत होती. ‘दीर्घायु फाम्र्स’सारख्या खाजगी फाम्र्सबरोबर करार करण्यात आला होता. कोटय़वधी रुपये खर्च करून न्हावा शेवा येथे एक रिसॉर्टदेखील बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत होता.