उपाध्यक्षांकडून माहिती तंत्रज्ञान विभागाची कानउघाडणी

विमानतळ, मेट्रो, स्मार्ट सिटीसारखे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेल्या सिडकोला हिशेबांचा ताळमेळ मांडणाऱ्या सॅपचा ताप अद्याप दूर करता आलेला नाही. त्यामुळे सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाची कानउघाडणी केल्याचे समजते. सिडकोत बसविण्यात आलेल्या सॅपचे हार्डवेअर उपलब्ध होत नसल्याने ही प्रणाली ठप्प झाली आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली बसविण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान, स्वप्नपूर्ती योजनेतील ग्राहकांच्या घरांचे करारनामे सुरू करण्यात येणार आहेत.

सिडकोतील सर्व आर्थिक व्यवहारांची पूर्तता गेली १२ वर्षे सॅप संगणकप्रणालीद्वारे केली जाते. ८ डिसेंबरपासून या प्रणालीच्या सव्‍‌र्हरमध्ये अचानक बिघाड झाल्याने सिडकोत संगणकाद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. पूर्वीसारखी ‘मॅन्युअली’ कामे करण्यात येत आहेत. याचा सर्वाधिक फटका खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहसंकुलात घर घेणाऱ्यांना बसला आहे. या ग्राहकांनी भरलेल्या रकमेच्या नोंदी या सॅपप्रणालीत नमूद आहेत. ही प्रणालीच कोलमडल्यामुळे विलंब आकार अथवा व्याज हे तात्काळ सांगणे अशक्य झाले आहे. केवळ मूळ रक्कम घेण्यात येत असून इतर गणित बिघडले आहे. त्यामुळे स्वप्नपूर्तीच्या ग्राहकांना १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आतापर्यंत ही तांत्रिक समस्या दूर होईल, असे अधिकारीवर्गाला वाटत असताना सिडकोच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने हात टेकले आहेत. या सॅप संगणक प्रणालीमध्ये गेल्या १२ वर्षांचा हिशेब संकलित करण्यात आला असून ‘मॅन्युअली’ काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. त्यात सिडकोत कर्मचारी अधिकारीवर्गाची कमतरता आहे. सॅप दुरुस्त होत नसल्याने पणन व लेखा विभागातील अधिकारी कर्मचारी रडकुंडीला आले आहेत. सिडकोत बसविण्यात आलेली ही प्रणाली कालबाह्य़ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी लागणारे सुटे भाग उपलब्ध होत नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सॅपमधील बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नाही. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग प्रयत्नशील आहे. या प्रणालीत गेल्या १२ वर्षांचा आर्थिक डेटा संग्रहित करण्यात आला आहे. नवीन प्रणालीत हा डेटा नोंदवता आला तर कामे सोपी होतील. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. स्वप्नपूर्तीच्या ग्राहकांचे रोज १० या प्रमाणे करारनामे केले जाणार आहेत.

– विवेक मराठे, पणन व्यवस्थापक, सिडको