न्यायालयाच्या निर्णयामुळे लवकरच नवीन निविदा

नवी मुंबई : ठेकेदार व पालिका यांच्यात गेली पाच वर्षे न्यायालयात वाद सुरू असल्याने पालिकेच्या रुग्णालयांतील साफसफाईचा नवीन ठेका पालिका प्रशासनाला देता आला नव्हता. आता न्यायालयाने पालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने या कामाची निविदा प्रक्रिया राबविता येणार आहे.

साफसफाईचा कंत्राट रद्द केल्याप्रकरणी  ‘बीव्हीजी’ कंपनीने महापालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने कंपनीच्या मागण्या अमान्य करीत पालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. सुमारे पाच वर्षांनंतर उच्च न्यायालयाने बीव्हीजीच्या दोन्ही मागण्या अमान्य केल्या आहेत.

जानेवारी २०१६ मध्ये पालिकेच्या ऐरोली, वाशी, नेरुळ येथील सामान्य रुग्णालये आणि बेलापूर,  कोपरखैरणे आणि तुर्भे येथील तीन  माताबाल रुग्णालयांच्या स्वच्छता कामांचे कंत्राट बीव्हीजी या कंपनीला निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून देण्यात आले होते. मात्र त्यांचे काम असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीव्हीजी कंपनीला तुमचा ठेका का रद्द करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांचे काम पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत चालू ठेवावे तसेच बीव्हीजीचे काम असमाधानकारक असल्यामुळे त्यांना पुनर्निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही नमूद केले होते.

याविरोधात  बीव्हीजी कंपनीने  मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे पालिकेला सदर कामाचा ठेका देण्यासाठी पुनर्निविदा प्रक्रिया राबवता आली नाही, तसेच प्रक्रिया राबविल्यास त्यात बीव्हीजीला भाग घेता येणार नाही याबाबत अंमलबजावणी करता आली नाही. न्यायालयाने आता पाच वर्षांनंतर या प्रकरणी पाालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने पालिकेला सदर कामाची निविदा आता नव्याने काढता येणार आहे.

बीव्हीजी कंपनीचे काम व्यवस्थित नसल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले होते व नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्याला स्थगिती घेत बीव्हीजी कंपनी न्यायालयात गेली होती. मात्र न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला असून आता निविदा प्रक्रियेतील अडथळा दूर झाला आहे. – संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका