दिघा येथील यादवनगर प्रभाग क्रमांक सहामध्ये पुढील आठवडय़ात होणाऱ्या पोटनिवडणुकीत राज्यात कुठेही न आढळणारी शिवसेना-भाजप-काँग्रेस छुपी युती झाली असून राष्ट्रवादीच्या येथील उमेदवार संध्या यादव यांना चारी मुंडय़ा चित करण्यासाठी हे स्थानिक विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे आठ हजार मतदारांच्या या प्रभागाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील नगरसेविका संगीता यादव यांनी बोगस जातीची प्रमाणपत्रे सादर केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. निवडणूक आयोगाने या एका जागेसाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक लावली असून, रिंगणात आता तिंरगी लढत होणार आहे.
काँग्रेस-शिवसेना-भाजप युतीने उभ्या केलेल्या मधुमती पाल ह्य़ा अपक्ष म्हणून उभ्या आहेत. त्या मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यां असून त्यांना शिवसेना-भाजपने पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी अर्थात माजी मंत्री गणेश नाईक यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक रामआशीष यादव यांच्या विरोधात हे शहरातील सर्व विरोधक एकत्र झाले असून, माजी खासदार संजीव नाईक यांनी या प्रभागातील प्रचाराची धुरा सांभाळली आहे. राष्ट्रवादीच्या संध्या यादव विरुद्ध अपक्ष मधुमती पाल अशी या ठिकाणी लढत होणार असून अपक्ष दर्शना आंगणे आपले नशीब आजमवणार आहेत. नाईक यांना चारी मुंडय़ा चित करण्यासाठी शहरातील काँग्रेस-शिवसेना-भाजपने यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत.
विशेष म्हणजे ही छोटीशी पोटनिवडणूक मोठी करण्यात आली असून, त्यासाठी काँग्रेसकडून स्थानिक नेत्यांसह शिवसेनेकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे जातीने लक्ष घालणार आहेत.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला २१०० मते मिळाली होती, तर काँग्रेसला ९८० मतांचा पल्ला गाठता आला होता. त्यामुळे काँग्रेसने या प्रभागावर दावा ठोकला असून ६०० मते मिळवणाऱ्या युतीने त्यांना समर्थन दिले आहे. त्यासाठी काँग्रेसने पाल यांना अपक्ष उमेदवारी भरण्यास भाग पाडले आहे.
राष्ट्रवादीच्या विरोधातील या युतीचा काँग्रेस, शिवसेना व भाजपचे कोणतेही स्थानिक नेते स्वीकार करण्यास तयार नाहीत.