News Flash

चार वर्षांत तिसरा खाडीपूल

१२०० कोटी रुपये खर्च करून १० पदरी शीव-पनवेल महामार्ग  बांधण्यात आल्यानंतर हा प्रवास सुकर झाला.

ठाणे खाडीवर येत्या साडेतीन वर्षांत तिसरा पूल बांधण्यात येणार आहे.

नव्या वाशी पुलाच्या उभारणीचे काम येत्या मार्चपासून

शीव-पनवेल मार्गावर गेल्या १० वर्षांत वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या कोंडीवर उपाय म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या तिसऱ्या ठाणे (वाशी) खाडीपुलावर ७७५ कोटी रुपये खर्च होणार आहे. पुढील वर्षी मार्चपासून या कामाला सुरुवात होणार आहे. तो तीन वर्षांत बांधून पूर्ण केला जाईल. यासाठी निविदापूर्व आर्हता मागविण्यात आली असून पाच कंत्राटदारांनी त्यात स्वारस्य दाखविले आहे.

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या जुन्या वाशी खाडीपुलाची निर्मिती फेब्रुवारी १९७२ मध्ये करण्यात आली. त्यापूर्वी नवी मुंबईत ठाण्याहून प्रवेश केला जात होता. काही प्रकल्पग्रस्त बोटीने मुंबईत ये-जा करत. मुंबईला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईचा झपाटय़ाने विकास झाल्याने ९०च्या दशकात चार पदरी जुना खाडीपूल अपुरा पडू लागला. त्यामुळे दुसऱ्या ठाणे खाडीपुलाची बांधणी करण्यात आली. हा सहा पदरी पूल बांधताना दिवसाला १२ हजार वाहने ये-जा करतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता, पण २५ वर्षांत या मार्गावर दिवसाला अडीच लाख वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. १२०० कोटी रुपये खर्च करून १० पदरी शीव-पनवेल महामार्ग  बांधण्यात आल्यानंतर हा प्रवास सुकर झाला. मध्यंतरी जुन्या खाडीपुलाला तडे गेल्याने काही वर्षांपासून तो अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन खाडीपुलावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढली. सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी या पुलावर दोन ते तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे या दुसऱ्या पुलाला पर्याय ठरू पाहणाऱ्या तिसऱ्या पुलासाठी ऑक्टोबर २०१५ पासून चाचपणी सुरू केली. जून महिन्यात राज्य मंत्रिमंडळानेही या पूल बांधणीला हिरवा कंदील दाखवला. राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुलाचा प्रकल्प अहवाल तयार केला असून त्यावर ७७५ कोटी ५८ लाख रुपये खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘स्टूप कन्सल्टंट कंपनी’ने या पुलाचा अभ्यास अहवाल सादर केला आहे.  मार्च २०२१ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

२०३६ पर्यंत टोल

ठाणे खाडीवर येत्या साडेतीन वर्षांत तिसरा पूल बांधण्यात येणार आहे. पूलाची लांबी १८३७ चौरस मीटर असेल. सध्या असलेल्या सहा पदरी पुलाच्या दक्षिण व उत्तर बाजूस एकूण सहा पदरी पुलांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे ये-जा करण्यासाठी असलेल्या दोन वेगवेगळ्या पुलांवर १२ मार्गिका बांधण्यात येणार आहेत. यात मुंबईच्या बाजूची लांबी ३८० चौ.मी असून नवी मुंबईच्या दिशेला ९३० मीटर असणार आहे. यासाठी एमएसआरडीसीने निविदापूर्व आर्हता मागविली असून यात अ‍ॅफकॉन, टाटा, सिम्पेलेक्स, गॅमन, आणि एल अ‍ॅन्ड टी या बांधकाम कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. या पुलावर होणाऱ्या खर्चाच्या वसुलीसाठी विद्यमान टोल कंत्राटदाराला २०३६ पर्यंत टोल वसुलीची सवलत दिली जाणार आहे. यासाठी लागणारी रेल्वे परवानगी मिळाली असून वन विभाग आणि मेरीटाईन बोर्डाची ना हरकत प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.

पुणे आणि गोवा या दोन राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा ठाणे खाडीपूल वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. वाढत्या वाहनांमुळे तिसऱ्या पुलाची गरज आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने या पुलाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. मार्च २०१८ मध्ये पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे.

– भूषण गगराणी, सह व्यवस्थापकीय संचालक, (प्र.) एमएसआरडीसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:21 am

Web Title: construction of new vashi bridge will be start from march this year
Next Stories
1 ‘सिटी सव्‍‌र्हे’अभावी गावांचा विकास ठप्प
2 पालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षांत कुस्तीचा आखाडा दृष्टिपथात
3 सानपाडय़ातील मैदानावरून वाद
Just Now!
X