नवी मुंबई : पालिकेने शहरातील नागरिकांच्या प्रती जन तपासण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची संख्येत वाढ दिसत आहे. या तपासणीत आढळून आलेले पण सौम्य लक्षणे असलेले ८० हजार नागरिकांचे दैनंदिन व्यवहार नियमित सुरू आहेत. त्यामुळे हेच नागरीक करोनाचे प्रसारक होत असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे. घरात अलगीकरण केलेल्या  नागरिकांच्या दैनंदिन हालचालीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रसार वाढू लागल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबईत एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या पंधरा हजाराच्या घरात आहे. यात रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या दिवसाला ६५ टक्के अर्थात ३०० पर्यंत आहे. करोना साथ रोगाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला पालिका उपचारार्थ दाखल करीत आहे. या रुग्णाच्या संर्पकात आलेले इतर नातेवाईक यांना सौम्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना घरी विलगीकरण केले जात आहे. ही संख्या ८० हजापर्यंत असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. घरात अलगीकरण कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या ही एक लाख १७ हजार आहे. घरात अलगीकरण केलेल्या व्यक्ती बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना पालिकेचे कर्मचारी हे घरात १४ दिवस अलग राहण्याचा सल्ला देत आहेत.

‘स्मार्ट वॉच’चा पर्याय

सफाई कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने मध्यंतरी ‘स्मार्ट वॉच’ ची संकल्पना राबवली होती. यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला नेमून दिलेली हद्द सोडून तो इतरत्र तर जात नाही हे मुख्यालयातील नियंत्रण कक्षात पाहिले जात होते. नागपूरमध्ये ही संकल्पना बाधितांच्या नातेवाईकांसाठी अमलात आणली गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविता आले आहे. त्यामुळे अलगीकरण केलेल्या व्यक्तीला दिल्यास त्यांच्या हालचाली वर लक्ष ठेवता येईल असे डॉक्टरांचे मत आहे.