लोकांच्या समस्या मांडायच्या तर बोलावे लागणार, प्रसंगी आवाजही चढवावा लागणार; पण पनवेल नगरपालिकेत विरोधी बाकांवरील सदस्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांकडून दाबला जात असल्याचा सनसनाटी आरोप करीत शुक्रवारी गोंधळ घालण्यात आला. पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. प्रश्न विचारल्यानंतर नगराध्यक्षांऐवजी इतर जण वेळकाढूपणा करतात, असे काही सदस्यांनी म्हटल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्य हमरीतुमरीवर आले. गोंधळाच्या वातावरणातच नगराध्यक्षांनी पटलावरील ३२ विषय सभेत मांडले. यापैकी दोन विषयांना स्थगिती मिळाली, तर इतर विषयांना मंजुरी मिळाली. सभेच्या शेवटच्या टप्प्यात सभेचे ध्वनिचित्रीकरण करीत असताना एका पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले.
नगर परिषदेच्या विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांनी एखादी समस्या किंवा प्रश्न नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्यासमोर मांडल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे स्वीकृत सदस्य जयंत पगडे हे उठतात आणि संबंधित प्रश्नावर बोलतात हा मूळ चिंतेचा विषय विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांना खुपत होता.
नगराध्यक्षा घरत पदावर विराजमान झाल्यापासून हीच पद्धत अमलात आणली गेली. मात्र याच पद्धतीमुळे आज सभागृहात सदस्य निर्मला म्हात्रे यांनी विचारलेल्या प्रश्नावर पगडे नेहमीप्रमाणे उत्तर देऊ लागले आणि नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सभागृहात सदस्यांचा एकेरी सूरही ऐकायला मिळाला.
आजच्या सभेपुढे सामान्य पनवेलकरांसाठी महिलांना उद्योजिकांचे प्रशिक्षण, शिक्षणाच्या सोयीसुविधा, कंत्राटांची परवानगी, आरोग्यविषयी आणि इतर विषय मांडले गेले. सभागृहासमोर मागील सर्वसाधारण बैठकीत झालेल्या इतिवृत्त चुकीचे लिहिल्याबद्दल शुक्रवारी मतदान घेऊन हे वृत्त खरे असल्याचे सिद्ध केले.
सभा संपताना अनेक सदस्यांनी ही सभा कदाचित शेवटची असल्याचा संशय या वेळी व्यक्त केला. सभेच्या शेवटी संतोष कांबळे नावाच्या पत्रकाराला ध्वनिचित्रफीत मुद्रित करताना ताब्यात घेऊन त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आले.

पनवेल नगरपालिकेची चार वर्षे जवळपास सरत आली आहेत आणि येत्या काही दिवसांत पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीची अधिसचूना जारी होण्याची शक्यताही आहे. गेल्या चार वर्षांत लोकांच्या समस्या आणि मागण्यांवर आवाज उठवणाऱ्यांना सभागृहात आवाज दाबला जातोय, हे एक वर्ष शिल्लक असताना कसे काय आठवले, असा सवाल जाणकारांकडून विचारला जात होता.