‘लोकल’गाडीचा माग घेत जीव मुठीत घेऊन दररोजचा प्रवास

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील धाकटा खांदेश्वर गाव सध्या धोकादायक गावांमध्ये समावेश होण्याच्या वाटेवर आहे. या गावात प्रवेश करण्यासाठी ग्रामस्थांना अगोदर हार्बर लोहमार्गाचा रेल्वे रूळ बेकायदेशीर ओलांडून प्रवेश करून गावात येणे-जाणे करावे लागते. ग्रामस्थांना रोजचे ‘लोकल’गाडीचा माग घेत जीव मुठीत घेऊन येथून मार्गक्रमण करावे लागते.

सोमवारी याच धोकादायक मार्गावरून पनवेल पालिकेच्या प्रथम नागरिक व आयुक्त यांचा जीवघेणा प्रवास माध्यमांनी अनुभवला. विशेष म्हणजे रोज याच बेकायदेशीर मार्गाने जीव मुठीत घेऊन नागरिकही असेच आपले घर गाठत आहेत.

पनवेल आणि खांदेश्वर या शहरांतील विकासाला खेटून असणारे धाकटा खांदेश्वर हे गाव मात्र अजूनही गावच्या प्रवेशद्वाराच्या अधिकृत प्रवेशासाठी झगडत आहेत. पनवेल पालिकेचे स्थायी समितीचे सभापती मनोहर म्हात्रे हे याच गावातील रहिवासी असल्याने म्हात्रे कुटुंबीयांनी या धोकादायक प्रवास टळण्यासाठी प्रशासनदरबारी मागील दहा वर्षांपासून पाठपुरावा केला. सिडको मंडळ व रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत म्हात्रे यांचा पाठपुराव्याच्या कागदांची फाईल जाड झाली, मात्र अद्याप पादचारी पुलाचे काम काही पूर्ण झाले नाही.

सोमवारी पालिकेच्या शाळा क्रमांक-६ येथील सोहळ्यासाठी पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि महापौर कविता चौतमोल यांनी शाळेपासून जवळचे अंतर हाच रेल्वे रूळ ओलांडून असल्याने त्यांनीही रूळ ओलांडणे सामान्यांसारखे मंजूर केले. खांदेश्वर येथे हार्बर रुळावर मोठा वळसा असल्याने अचानक येणाऱ्या लोकलने कर्णकर्कश भोंगा न वाजविल्यास लोकलगाडी कधी शेजारी उभी आहे ते रूळ ओलांडणाऱ्यांना कळणारच नाही. कोणताही फाटक येथे नसल्याने पुलाचे बांधकाम होण्यापूर्वी येथे अपघातांची मालिका होईल हे निश्चित झाले आहे. त्यामध्ये काही नागरिक कानात मोबाइलचा एअरफोन घालून धुंदीत ये-जा करीत असल्याने अपघातांना आमंत्रणच मिळत आहे. पादचारी पुलाच्या बांधकाम अद्याप अपूर्ण आहे.

पादचारी पुलाची रडकथा

धाकटा खांदा गावातील पुलासाठी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी १९८६ पासून माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. सरकारदरबारी रेल्वे रूळ ओलांडायला व भुयारी मार्गासाठी माफक अपेक्षा खांदेश्वर ग्रामस्थांची होती. अनेक वर्षांनंतर माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांचे पुत्र मनोहर हे पनवेल नगरपालिका व महापालिकेचे सदस्य झाले त्यांनीही हा प्रश्न लावून धरला. त्याला यश मिळाले. सिडको मंडळ व रेल्वे प्रशासनात एकवाक्यता झाली आणि पादचारी पुलाचे काम २०१८ सालच्या पावसाळ्यात सुरू झाले ते अद्याप पूर्ण झाले नाही. मात्र पुलाचे काम संथगतीने असताना सिडको मंडळाच्या नियोजन विभागाने नवीन खो घातला. रेल्वे प्रशासनाने बांधलेल्या पुलाच्या जागेत सिडको मंडळाचा रस्ता जात असल्याने या पुलाचे व भुयारी मार्गाचे काम रखडल्याचे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले.