खारघरमधील घटना; बँकबुडीच्या वृत्ताचा धक्का

पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील ठेवी बुडाल्याच्या वृत्ताने मानसिक धक्का बसलेल्या  आणखी एका ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना खारघरमधील ज्वेल एकविरा इमारतीत घडली. कुलदीप कौर विग असे मृत महिलेचे नाव आहे.

पंजाब-महाराष्ट्र बँकेतील ठेवींविषयी कोणतीही हमी मिळत नसल्याने अनेक ग्राहक सध्या अस्वस्थ आहेत. याविषयीच्या अनेक बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. वृत्तवाहिन्यांवरून याबाबतचे वृत्तांकन केले जात आहे. कुलदीप कौर यांनी गुरुवारी रात्री टीव्हीवर बातम्या पाहिल्या. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तशा स्थितीतच त्या रात्री झोपल्या. सकाळी त्या उठल्या नाहीत, आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर त्यांची काहीच हालचाल झाली नाही. त्यांना रुग्णालयात दाखल नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती कुलदीप कौर यांच्या पतीने दिली.

पंजाब-महाराष्ट्र बँकेत हक्काचे पैसे विम्याच्या कामासाठी निघू शकत नसल्याने मागील काही दिवस कुलदीप कौर विग या अस्वस्थ होत्या. प्रसारमाध्यमांवरील बातम्यांमुळे त्यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागले. तो धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी कुलदीप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुलदीप कौर आणि त्यांच्या पतीच्या खात्यावर सुमारे १७ लाख रुपये जमा आहेत. काही दिवसांपासून विमा कंपनीचा हप्ता भरण्यासाठी कुलदीप आणि त्यांच्या कुटूंबियांना दूरध्वनी आला होता. एक महिना शिल्लक असल्याने विग कुटुंबीयांनी विमा कंपनीच्या एंजटला पंजाब महाराष्ट्र बँकेचा धनादेश चालेल का, अशी विचारणा केली होती. मात्र अजून हा धनादेश चालणार नसल्याचे ध्यानात आल्यावर विग कुटुंबीय अस्वस्थ झाले होते.