आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली

नवी मुंबईत रात्री वाशी व ऐरोली पुलावरून येणाऱ्या डेब्रिजच्या गाडय़ांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. जुईनगर येथे कांदळवन बुजवून मैदान तयार झाले आहे, तर नेरुळ सेक्टर २ येथे तलावावर भराव टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पाठोपाठ डेब्रिज टाकण्याची एक नवीन जागा शोधण्यात आली असून आता तांडेल मैदानातही डेब्रिजच्या गाडय़ा रित्या केल्या जात आहेत. संबंधित विभाग अधिकारी व डेब्रिजविरोधी फरारी पथक मात्र निद्रावस्थेत आहे.

शहरात डेब्रिज टाकण्याची परवानगीच नसताना दररोज हजारो गाडय़ा रिकाम्या केल्या जात आहेत. नवी मुंबईत ठिकठिकाणी कांदळवनांवर टाकण्यात आलेल्या भरावामुळे अनेक झाडे सुकली आहेत. उच्च दाब वीजवाहिन्यांखाली चक्क क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. आता कोटय़वधी रुपये खर्चून ज्याचे रूप पालटले जाणार त्या तांडेल मैदानालाच डेब्रिज माफियांनी लक्ष्य केले आहे.

‘डेब्रिज टाकले जाऊ नये यासाठी बंदोबस्त करा किंवा कारवाईला सामोरे जा,’ असे आदेश आयुक्तांनी दिले असतानाही फरारी पथकाने मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे यात आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याची शंका रहिवाशांना येऊ लागली आहे.

या संदर्भात पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘डेब्रिजवर कारवाई करणारी भरारी पथके वाढविण्यात आली आहेत. त्यांच्या जीविताला धोका आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.’

प्रत्येक पथकासोबत अतिक्रमण कारवाईसाठी असलेल्या पोलिसांपैकी एक कर्मचारी देण्यात आला आहे. त्यामुळे विभाग अधिकारी व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनीही योग्य ती कारवाई करायला हवी, अन्यथा संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

डेब्रिज टाकलेली ठिकाणे

  • सीवूड्स स्थानकाच्या पूर्वेला सेक्टर २५ येथील उड्डाणपुलाजवळील भूखंड
  • जुईनगर रेल्वे वसाहती मागील सेक्टर २२ येथील उच्चदाब वाहिन्यांखालील कांदळवन
  • नेरुळ येथील होिल्डग पाँड
  • करावेजवळील तांडेल मैदान

पथकाची कारवाई

डेब्रिजविरोधी भरारी पथकाने २०१७-१८ या वर्षांत अवघ्या ६८ वाहनांवर कारवाई केली. त्यातून १७ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आठवडाभरात आठ वाहने पकडण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.