13 August 2020

News Flash

खाडीमुखावरील बेकायदा बांधकामांमुळे मासळीत घट

पूर्वी उरण मध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून खाडीतील मासेमारीकडे पाहिले जात होते.

(संग्रहित छायाचित्र)

कोळंबी, निवटय़ा, खुबे जातीचे मासे गायब

जगदीश तांडेल, उरण

उरण परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी येथील समुद्रातून खाडीत येणाऱ्या पाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले तसेच खाडय़ाही बुजविल्या जात असल्याने खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या मासळीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. डिसेंबरपासून हिवाळ्याच्या तोंडावर समुद्रातून लाखोंच्या संख्येने ताजी मासळी खाडीत येते मात्र, यावेळी समुद्राचे पाणीच खाडीत येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. याचा फटका येथील स्थानिक मासेमारीवर होणार आहे. यामध्ये खास करून चिखलातून मिळणाऱ्या कोळंबी, निवटय़ा व खुबे या चविष्ट मासळीला नागरीकांना मुकावे लागणार आहे.

पूर्वी उरण मध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून खाडीतील मासेमारीकडे पाहिले जात होते. समुद्रातून भरतीच्या वेळी मुबलक प्रमाणात नैसर्गिक नाल्यात मासळी येत असल्याने गाव व घराशेजारीच ही मासळी मिळत होती. मात्र, सिडको तसेच चौथ्या बंदरासह इतर विकास कंपन्यांनी या परिसरातील तसेच गावपरिसरातील नैसर्गिक नाले आणि खाडीची मुखे हळूहळू बुजविली आहेत. त्यामुळे खाडींची मुखेही हळूहळू बंद पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे समुद्र मार्गे खाडीत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यातून याच प्रवाहाद्वारे खाडीत येणाऱ्या ताज्या मासळीचेही प्रमाण मागील अनेक वर्षांत हळू हळू कमी होऊ लागले आहे.

खाडीतून नाल्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर मासळी पकडणारे स्थानिक मासेमारांचा व्यवसाय हिवाळ्याच्या काळात चांगला होत असतो. मात्र, यंदा त्याला फटका बसणार असल्याची खंत बोकडविरा येथील स्थानिक मच्छीमार जयवंत तांडेल यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शेतीला जोड असलेला छोटा व्यवसायही गमाविण्याची वेळ आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

संधी हुकणार?

हिवाळ्याच्या पहिल्याच हंगामात हौशी मंडळी आणि कोळीबांधव खाडीत मासळी पकडण्यास जातात, परंतु यंदा हा हंगाम सुरू होऊनही खाडीत माशांचा वावर अनेकांच्या नजरेस पडलेला नाही. त्यामुळे जाळी टाकून बसलेले काही जण नाराज आहेत. हिवाळ्यातील मासेमारीतून बऱ्यापैकी उत्पन्न हाती लागते, मात्र यंदा ही संधी सुटल्यात जमा आहे, अशी प्रतिक्रिया ेएका मच्छीमाराने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 4:42 am

Web Title: decline in fish due to illegal construction on the creek zws 70
Next Stories
1 झोडपट्टीतील सांडपाण्यामुळे पारसिक नाला प्रदूषित
2 कळंबोलीकर बेजार
3 कोपरखैरणेत रुग्णालयाची प्रतीक्षाच
Just Now!
X