प्रथम संदर्भ रुग्णालय सर्वसामान्यांसाठी तातडीने परावर्तित करणे अवघड असल्याचे पालिकेचे मत

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय गेले तीन महिने संपूर्ण करोना रुग्णालय करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रुग्णालयावर शहरातील सामान्यांची आजवर भिस्त होती. मात्र, करोना काळात हे रुग्णालय ‘कोविड’साठी उपलब्ध करून देण्यात आले. वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची आहे. याशिवाय पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून नेरुळ, ऐरोली आणि बेलापूर येथे रुग्णालये उभारली आहेत. परंतु सध्या ती शोभेपुरतीच आहेत.

याच वेळी वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात समर्पित ‘कोविड’ रुग्णालय तयार करण्यात आल्याने प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्ण तेथे हलविण्याची  मागणी आमदार गणेश नाईक यांनी केल्याने पालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अन्य आजाराच्या रुग्णांची गैरसोय होणार असल्याच्या शक्यतेमुळे प्रथम संदर्भ रुग्णालयाला पुन्हा सार्वजनिक रुग्णालय करावे आणि वाशीतील करोना रुग्ण सिडको प्रदर्शनी केंद्र येथे हलवण्याची मागणी नाईक यांनी केली होती.

पालिका म्हणते..

नवी मुंबईत पालिका प्रशासनाने नेरुळ आणि ऐरोली येथील रुग्णालयांत अन्य आजारांच्या रुग्णांसाठी अधिक खाटांची सोय  करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याशिवाय येथे डॉक्टर आणि परिचारिकांची तातडीने भरती करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

असून अडचण

* नेरुळ आणि ऐरोली येथील माता-बाल रुग्णालयांच्या जागी सात मजली इमारती उभारल्या आहेत. मात्र, या दोन्ही रुग्णालयात आजवर आवश्यक आरोग्यसुविधा पुरविलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात व अन्यवेळीही वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रुग्ण येत असल्याने खाली गाद्य टाकूनही उपचार केले जात असल्याचे चित्र नवी मुंबईकरांनी अनुभवले आहे. ३०० खाटांचे सार्वजनिक रुग्णालय पुरत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

* नेरुळ येथील रुग्णालयात वाशी रुग्णालयातील एचआयव्ही आणि क्षयरोग उपचार विभाग वर्ग करण्यात आला आहे. मात्र, नेरुळ आणि ऐरोली येथील रुग्णालयात अतिदक्षता विभाग नाही.

* प्रथम संदर्भ रुग्णालयातील काही आरोग्यसेवा नेरुळ येथील रुग्णालयात तर काही सेवा ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आल्या. तर पालिकेची भिस्त नेरुळ येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयावर आहे.

करोना रुग्णालय तातडीने सार्वजनिक रुग्णालय करणे अवघड आहे. करोनाचे गंभीर स्थितीतील रुग्ण येथे आणले   जातात. त्याचप्रमाणे शवागार व इतर महत्त्वाच्या सुविधा येथे आहेत. अन्य आजारांच्या रुग्णांसाठी नेरुळ आणि  ऐरोलीत सोय करीत आहोत.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त