राज्यभरात नवी मुंबईत प्रथमच सुविधा

खासगी शाळांत असलेली डिजिटल शिक्षणाची सुविधा आता नवी मुंबई महापालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पालिका शाळांतील सर्व वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून ही सुविधा मिळणार आहे. राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये असा प्रयोग करणारी नवी मुंबई ही पहिलीच महापालिका ठरणार आहे. सर्व वर्ग डिजिटल करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे.

नवी मुंबईतील पालिका शाळांची पटसंख्या चांगली आहे. ती दर वर्षी वाढत असल्याने पालिकेनेही या सेवेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यात येत आहेत. पालिकेच्या ६८ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये २७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता तर पालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई पालिकेच्या शाळांना खासगी शाळांना खासगी शाळांसारख्याच सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व वर्गाना स्मार्ट क्लास बनविण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे.

यापूर्वी वर्गाना आळीपाळीने संगणक प्रशिक्षण दिले जात असे. आता प्रत्येक वर्गासाठी एक संगणक देण्यात येणार आहेत. शिक्षक जो विषय शिकवतील त्या विषयावरची प्रात्यक्षिके संगणकावर दाखवण्यात येणार आहेत. वेगळा संगणक वर्ग ठेवण्यात येणार आहे.

या सुविधेमुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढेल, असा पालिकेचा दावा आहे. पुस्तकी ज्ञानापलीकडे संगणकावर चलचित्रे दाखवण्यात येतील. चित्रे, ध्वनी आणि संवादांमुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक रंजक पद्धतीने आणि सहज समजावता येणार आहे. प्रगत देशांत अशा प्रकारची शिक्षण पद्धत अवलंबण्यात येते. खासगी शाळांतही आता या सुविधा देण्यात येत आहेत. पालिका शाळांत येणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांनाही आता या आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेने हा प्रस्ताव तयार केला आहे.

नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थीसंख्या लक्षणीय आहे. देशाची भावी पिढी शिक्षणामुळे घडते. त्यामुळे त्यांच्या विकासत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. खासगी शाळेत मिळणाऱ्या सर्व सुविधा पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठीच स्मार्ट क्लास संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका