सर्व कायम व कंत्राटी कामगार अधिकाऱ्यांचे लोकेशन ओळखणाऱ्या ‘स्मार्ट वॉच’ च्या प्रयोगाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लागत असून त्यांच्या हजेरीचे प्रमाण वाढले असून ९५ टक्के हजेरीच्या नोंदी झाल्या आहेत. कामावर हजेरी लावून इतरत्र फिरणाऱ्यांना शिस्त लागली आहे.

नवी मुंबई पालिका अस्थापनेतील सर्व कायम व कंत्राटी कामगार अधिकाऱ्यांचे लोकेशन ओळखणारे एक स्मार्ट वॉच देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आतापर्यंत तीन हजार घडय़ाळे मनगटावर दिसू लागली आहेत. केवळ कामाचे ठिकाणच नाही तर त्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची माहिती देखील या स्मार्ट वॉचमुळे मिळत आहे. या स्मार्ट वॉचमुळे कर्मचारी किती वाजता कामावर आला, किती वाजता कामावरून गेला, कोणत्या क्षेत्रात तो काम करीत आहे. यासारख्या हालचालींची माहिती मुख्यालयात असणाऱ्या नियंत्रण केंद्राला मिळत आहे. जीपीआरएस प्रणालीवर अवलंबून असणाऱ्या ही घडय़ाळे टप्प्याटप्प्याने आठ हजार ७०० पर्यंत कर्मचारी अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांची दिवसभराची इत्थंभूत माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध होत आहे. विशेषत: पालिकेतील कंत्राटी कर्मचारी तसेच अधिकारी मनमानी करीत असत. आपल्या सोयीनुसार काम करीत असत. तसेच ठेकेदारही कामावर नसताना त्यांच्या हजेरी नोंदवीत असत. हे चित्र आता बदलत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. नित्याने कामावर हजर राहणाऱ्यांच्या अचूक नोंदी होत असून हजेरीप्रमाणे त्यांना कामाचा मोबदला देण्यात येणार आहे.

‘स्मार्ट वॉच’ फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत हजर राहण्याची शिस्त लागलेली आहे. ९४ ते ९५ टक्के हजेरीच्या नोंदी झाल्या आहेत. तसेच हेजेरीप्रमाणे त्यांना मानधन देण्यात येणार आहे.

-तुषार पवार,

उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन