उरणमध्ये घटाभोवती ढोलकीच्या तालावर गाण्यांचा जल्लोष; पारंपरिक गाण्यांना पसंती

शनिवारपासून पुढचे नऊ दिवस साजाऱ्या करण्यात येणाऱ्या नवरात्रौत्सवात रास गरब्याबरोबरच दांडिया आणि आताच्या जमान्यातील डॉल्बी गरबाही उत्साहाने खेळला जाणार आहे. उरणमध्ये पूर्वी देवीच्या घटस्थापनेनंतर देवीच्या घटाभोवती फेर धरून पारंपरिक गाण्यांवर गरबा खेळला जायचा. त्यानंतर रेकॉर्डवरच्या गाण्यांवर गरबा खेळला जाऊ लागला, आता त्याची जागा डॉल्बी गरब्याने घेतली आहे.

उरणमध्ये नवरात्रीचा उत्सव हा गावोगावी ग्रामदेवी तसेच घरातील देव्हाऱ्यात घट बसवून साजरा केला जात होता. तर उरण शहरातील वाणी आळीमध्ये गुजराती समाजाकडूनही घटस्थापना करून या घटाभोवती फेरा धरून मधुर आवाजात ढोलकीच्या तालावर गाणे गात गरबा केला जात असे. त्यानंतरच्या काळात गावागावांत सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू झाले. घटांची जागा देवीच्या मूर्तीनी घेतली. सुरुवातीला रेकॉर्डच्या तालावर खेळला जाणारा गरबा डॉल्बीचा शोध लागल्यानंतर डॉल्बीच्या तालावर खेळला जाऊ लागला. दररोज विविध प्रकारची आकर्षक वेशभूषा करण्याची पद्धत सुरू झाली. सध्या विविध ठिकाणी प्रसिद्ध गायकांना बोलावून त्यांच्या बँडच्या तालावर गरबा खेळला जातो. मात्र त्यामुळे नवरात्रीतील देवीच्या जनजागरणालाही व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले असून पारंपरिक गरब्याचे स्वरूपच नव्या पिढीने बदलले आहे, अशी टीकाही काही ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे.