महत्त्वाची पदे देऊनही वर्षांत आठ नगरसेवकांकडून पक्षबदल

नवी मुंबई : राजकरणात शेवटपर्यंत साथ सोडू नये यासाठी चार हजार कोटी अर्थसंकल्प असलेल्या पालिका तिजोरीच्या चाव्या हातात दिल्यानंतरही ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची एक वर्षांत आठ नगरसेवकांनी साथ सोडली आहे. मंगळवारी शहराच्या उत्तर भागाचे नेतृत्व करणाऱ्या नवीन गवते यांनी नाईकांना रामराम ठोकला. त्यापूर्वी गेल्यावर्षी मध्य नवी मुंबईचे खंबीर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी चार नगरसेवकांसह नाईकांबरोबर चाळीस वर्षांचे संबध तोडले.

गवते, कुलकर्णी यांना नाईकांनी पालिकेच्या स्यायी समितीची जबाबदारी दिली होती. यापूर्वी सिडको संचालक, शहराचे महापौर, स्यायी समिती, परिवहन समित्या बहाल केल्यानंतरही नाईकांना या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी टाळलेले आहे.

आमदार नाईकांची गेली तीस वर्षे पालिकेत सत्ता आहे. कोणत्याही पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नाईकांनी पालिकेवर मात्र एकहाती सत्ता ठेवली आहे. राजकारणात ४९ वर्षे सक्रिय असलेल्या नाईकांनी त्यांना साथसोबत देणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच मोठी पदे दिलेली आहेत. त्यासाठी निकटवर्तीयांचा रोष देखील ओढवून घेतलेला आहे. चिंचपाडासारख्या झोपडपट्टीचे नेतृत्व करणाऱ्या विजय चौगुले या कार्यकर्त्यांला नाईक यांनी पहिल्या शिवसेना-भाजप युती काळात सिडकोसारख्या श्रीमंत महामंडळाचे संचालक पद दिले. त्यावेळी नाईकांना मोठय़ा प्रमाणात विरोध झाला. त्याच चौगुले यांनी हे पद मिळाल्यानंतर दहा वर्षांत नाईकांची साथ सोडली. नवी मुंबईसारख्या श्रीमंत पालिकेचे दुसरे महापौर पद सुषमा दंडे या सर्वसामान्य कार्यकर्तीला दिले. त्यांनी तर नाईकांच्या विरोधात मातोश्रीचे कान भरले. त्यामुळे नाईकांना पहिल्या युती काळात मंत्री पदावर पाणी सोडावे लागले. कार्यकर्त्यांबरोबरच सख्खा छोटय़ा भावाने नाईकांशी फारकत घेऊन महापौर पद पदरात पाडून घेतले.  काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत नाईक यांना नेहमीच चांगली मंत्री पदे व जिल्हय़ाचे पालकमंत्री पद मिळाले होते. तोपर्यंत नाईकांची साथ सोडणारे कमी होते, मात्र नाईकांचा भाजप प्रवेश अनेकांना रुचलेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी सुरेश कुलकर्णी व आता नवीन गवते या दोन प्रबळ नगरसेवकांनी तीन-चार नगरसेवकांसह नाईकांना रामराम ठोकला आहे. यानंतरही अनेक माजी नगरसेवक ज्यांना नाईकांनी महत्त्वाची पदे दिली ते साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पद देऊनही नाईकांची साथ आजी- आजी नगरसेवक का सोडत आहेत याची चर्चा सध्या नवी मुंबईत रंगली आहे. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यात नाईक अपयशी ठरत असल्याचे बोलले जाते. यामागे नाईक कुटुंबात निर्माण झालेली अनेक सत्ताकेंद्रे कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

अनेक जण घरवापसी करण्यास उत्सुक

तुर्भे येथील माजी स्यायी समिती सभापती शुभांगी पाटील व त्यांचे तीन सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वापसी करणार आहेत. नेरुळमधील काही नगरसेवकही भाजप सोडणार आहेत. काँग्रेस पक्षाला कंटाळलेले वाशीतील तीन नगरसेवक शेवटपर्यंत राजकीय हालचालीकडे लक्ष देऊन आहेत, मात्र त्यांनी केलेला भाजप प्रवेश आता नाममात्र ठरला आहे. त्यांनी सामाजिक संस्थेच्या नावावर कार्य करण्यास प्राधान्य दिले आहे.