उरणच्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर असलेला ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला कायमच दुर्लक्षित राहिला आहे. पायथ्याशी ओएनजीसी प्रकल्प असल्याने अनेक बंधने येत आहेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागही लक्ष देण्यास तयार नाही. किल्ल्याची पडझड होत असल्याने दुर्मीळ ठेवा नष्ट होत आहे.
रायगडमधील उरण शहरानजीक असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर द्रोणागिरीचा ऐतिहासिक किल्ला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी द्रोणागिरी देवीचेही मंदिर आहे. करंजा गावाजवळ असलेला हा किल्ला महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. १० मार्च १७३९ ला हा किल्ला मनाजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. येथील मूर्ती शिलालेख आहेत. चर्चजवळ दोन पाण्याच्या टाक्याही आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या ५० मीटर अंतरावर दक्षिणेस आहे. त्याची कमान तुटलेली आहे. संरक्षण खोल्यांची स्थितीही दयनीय आहे. सध्या अनेक संस्था किल्ल्याची डागडुजी व सफाई करण्याचे काम करीत आहेत. किल्ल्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी प्रथम असंरक्षित स्मारक संरक्षित करण्याची गरज असल्याची माहिती राष्ट्रीय स्मारक विभागाचे साहाय्यक व पुरातत्त्व विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मयूर ठाकरे यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 7, 2020 12:14 am