पनवेल तालुक्यातील जमिनी ताब्यात घेऊन उभारण्यात येत असलेल्या ‘नैना’ प्रकल्पाविरोधात राजकीय पक्षांच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. सीबीडी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला; मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आंदोलनातील संख्या फारच कमी असल्याने मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे. खारघर रेल्वे स्थानकासमोरून मोर्चा निघाला. यात शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भीमशक्ती संघटना आणि महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.

सिडकोने शेतकऱ्यांची मते जाणून घ्यावीत, त्यानंतरच नैना प्रकल्प राबवावा, अशी मागणी करण्यात आली. अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. मात्र सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकरी कमी पण राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले. नैना प्रकल्पासाठी २५ एकर जमीनमालकांनी एकत्रित येऊन सामायिक विकसित क्षेत्र उभारावे, असे सिडकोचे म्हणणे आहे; मात्र या जमिनीसाठी ३० कुटुंबांना एकत्र येणे सध्या शक्य नसल्याचे मत अनेक आंदोलकांनी व्यक्त केले. २५ एकरऐवजी पाच एकर हा नियम ठेवावा; तसेच गावठाणापासून २०० मीटरवरील जमिनीसाठी अडीच वाढीव चटईक्षेत्र मिळावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. मोर्चाचे नेतृत्व शेकापचे विवेक पाटील, बाळाराम पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे सुनील घरत, सतीश पाटील यांनी केले.