13 December 2017

News Flash

हळदीत धिंगाणा; पोलिसांना मारहाण

बुधवारी कोपरखैरणे येथील कुंदन म्हात्रे यांचा हळदी समारंभ पहाटे तीनपर्यंत सुरू होता.

विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: April 21, 2017 12:25 AM

दोन पोलिसांसह तीन नागरिक जखमी

कोपरखैरणे येथील एका प्रकल्पग्रस्ताच्या हळदी सभारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या डीजेच्या दणदणाटामुळे पोलीस आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात बुधवारी रात्री हाणामारी झाली. त्यात दोन पोलिसांसह तीन नागरिकदेखील जखमी झाले. त्यामुळे या परिसरात हळदी समारंभात होणाऱ्या दणदणाटावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वी ऐरोलीत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मोहन मढवी यांच्या मुलीच्या हळदी सभारंभात संगीत कार्यक्रम बंद करण्यात आला होता. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली होती.

नवी मुंबईत आगरी कोळी समाजाची संख्या मोठी आहे. त्यांच्याच जमिनीवर हे शहर वसविण्यात आले आहे. शहरीकरणामुळे गावाच्या चारही बाजूने इमारती उभ्या राहिल्या आणि मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले. समाजाच्या प्रथा तशाच आहेत. आगरी कोळी समाजात लग्नापेक्षा हळदी समारंभाला जास्त महत्त्व दिले जाते. यात मांसाहर आणि मद्यपान हा अविभाज्य घटक मानला जातो. त्यामुळे गावकरी आणि आजूबाजूच्या गावांतील मित्रमंडळी हळदी सभारंभानिमित्त एकत्र येतात आणि जोरात नाचगाणे सुरू होते. गावाचे शहरात परिवर्तन झाल्यमुळे आता रात्री उशिरापर्यंत डीजे सुरू ठेवल्यास परिसरातील रहिवासी पोलीस ठाण्यात तक्रारी करतात.

बुधवारी कोपरखैरणे येथील कुंदन म्हात्रे यांचा हळदी समारंभ पहाटे तीनपर्यंत सुरू होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला तक्रार केली. त्यामुळे डीजे बंद करण्यासाठी बीट मार्शल घटनास्थळी पोहचले. त्यात पोलीस आणि प्रकल्पग्रस्तांच्यात बाचाबाची होऊन प्रसंग हाणामारीपर्यंत आला. त्यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागवून लाठीचार्ज केला.  त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे सानपाडा येथे आवाज बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मटणाचा गरम रसा फेकण्यात आला होता. त्यामुळे हळदी समारंभातील दणदणाटामुळे पोलीस आणि ग्रामस्थांत अशी ठिणगी पडत असल्याचे दिसते. सध्या विवाह आणि गावजत्रांचे दिवस असल्यामुळे गावातील ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्याला शहरी नागरिकांचा विरोध असून ग्रामस्थ आपल्या चालीरीतींवर ठाम आहेत.

First Published on April 21, 2017 12:23 am

Web Title: fighting in marriage haldi function