– पूनम धनावडे

तुर्भे एमआयडीसीतील तीन हजार कंपन्यांची भिस्त ६० अग्निशमन कर्मचाऱ्यांवर

तुर्भे औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटना वारंवर घडत असताना या आगी वेळेत विझविण्यात एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा निष्प्रभ ठरत आहे. अपुरे मनुष्यबळ हे यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मुकंद कंपनीपासून नेरुळ-उरणपर्यंतच्या पट्टय़ातील सुमारे तीन हजार कंपन्यांची भिस्त अवघ्या ५० ते ६० अग्निशमन कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठी आग लागल्यास एमआयडीसीच्या तीन अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त बाहेरील केंद्रांची मदत घ्यावी लागत आहे. खैरणे एमआयडीसीत बुधवारी लागलेल्या आगीमुळे एमआयडीसीच्या ढिसाळ कारभाराचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे.

तुर्भे एमआयडीसीअंतर्गत तीन अग्निशमन केंद्रे आहेत. वेल्फेअर असोसिएशन, जुईनगर डी ब्लॉक आणि राबळे आर ब्लॉक या तीन केंद्रांपैकी वेल्फेअर असोसिएशन केंद्र ठेकेदार पद्धतीने चालविले जात आहे. राबळे आर ब्लॉक या दलात अवघे १३ कर्मचारी आणि ६ वाहने आहेत. प्रत्येक वाहनावर ६ कर्मचारी असणे गरजेचे आहे, तसेच वाहनचालकांचीसुद्धा कमतरता आहे. केवळ दोन वाहनचालकांवर काम चालविले जात आहे. या केंद्रात कमीत कमी ६० कर्मचारी असणे आवश्यक असताना १३ जणांवर अग्निशमनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डी ब्लॉक येथील अग्निशमन केंद्रातही हीच स्थिती आहे. तिथे ४ वाहने उपलब्ध असून ३०ते ४० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ १४ कर्मचारी तैनात आहेत. वेल्फेर असोसिएशन हे अग्निशमन केंद्र तर ठेकेदारी पद्धतीने कार्यरत आहे. याठिकाणी अवघे १० ते १२ कर्मचारी आहेत. तुर्भे एमआयडीसीकरिता कमीत कमी ९० ते १०० कर्मचाऱ्यांची अवशक्यता असताना अवघे ५० ते ६० कर्मचारी आहेत. यामुळे खैरणेत रासायनिक कंपन्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी इतर १० अग्निशमन केंद्रांची मदत घेण्याची नामुष्की एमआयडीसीवर ओढावली.

तुर्भे एमआयडीसीतील अग्निशमन दलाकडे आवश्यकतेच्या तुलनेत कमी मनुष्यबळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास इतर ठिकाणच्या अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागते. याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आहे. नवीन कर्मचारी भरती होतील अशी अपेक्षा आहेत.   – आर. बी. पाटील, अग्निशमन अधिकारी, राबळे एमआयडीसी

२४ तास कर्तव्यावर

एमआयडीसीच्या अग्निशमन दलात अद्ययावत साधने आहेत, मात्र मनुष्यबळ कमी पडत आहे, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आठ तासांची डय़ुटी असताना २४ तास ऑन डय़ुटी राहावे लागत आहे. महिन्यात फक्त एकदाच २४ तासांचा कालावधी ओव्हर टाइम म्हणून गृहीत धरला जातो. २०१५ नंतर एकही नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नाही.

स्थनिक अधिकारी अनभिज्ञ

या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची अग्निसुरक्षा, ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादींची तपासणी, तपशील, अहवाल इत्यादीविषयी स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांना कोणत्या कंपनीचे फायर ऑडिट झाले, काय नियोजन आहे, कोणत्या प्रकारची अग्निशमन यंत्रणा आहे, त्याचा कालावधी कधीपर्यंत आहे, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आग लागल्यानंतर परिस्थिती हाताळण्यात अडथळे निर्माण होतात.