पुनर्वसन करण्याची मागणी
करंजा येथे करंजा टर्मिनल अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरकडून बंदराची उभारणी केली जाणार असून या बंदराच्या निर्मितीमुळे उरण तालुक्याच्या पूर्व विभागातील अनेक गावांतील मच्छीमारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा बाधित मच्छीमारांचे सर्वेक्षणानंतर पुनर्वसन करावे या मागणीसाठी मंगळवारी उरण तहसील कार्यालयावर मच्छीमारांनी मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण केले. या मोर्चात मच्छीमार पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
करंजा खाडी किनाऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या कंरजा टर्मिनलमुळे उरण तालुक्यातील खोपटे, कोप्रोली, आवरे, वशेणी, मोठी जुई, बोरखार, गोवठणे, वशेणी, दिघोडे, विंधणे, धाकटी जुई तसेच इतर खाडीकिनाऱ्यावरील मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे. खाडीमुखावरच प्रकल्प उभारला जात असल्याने अरबी समुद्रातून पाण्याच्या वेगाने येणाऱ्या मासळीची संख्या घटणार आहे. त्यामुळे करंजा टर्मिनलच्या विकासकांनी येथील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी मोठय़ा बोटी उपलब्ध करून द्याव्यात, मच्छीमारांसाठी जाळी तसेच इतर साहित्यही उपलब्ध करून द्यावे, नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी, केंद्र सरकारच्या २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाधित मच्छीमारांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आदी मागण्या मच्छीमारांनी केल्या. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, जेएनपीटीचे कामगार नेते भूषण पाटील तसेच संतोष पवार व मच्छीमार बचाव समितीचे अध्यक्ष देहू पाटील व सचिव हसुराम घरत यांनी केले. या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.