उरण तालुक्यातील पाणजे परिसरात शुक्रवारी एका फ्लेमिंगोला उच्च दाबाच्या विद्युत तारांचा धक्का बसल्याने फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची घटना यापूर्वीही घडली होती. उरणमध्ये येणारे विविध जातीचे पक्षी या परिसरात अन्नाच्या शोधात येतात. त्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून दक्षता घेण्याची मागणी पक्षीमित्रांकडून करण्यात आलेली होती. उरण परिसरातील पानथळ्यांवर मोठय़ा प्रमाणात देशीविदेशी पक्षी येतात. त्यांचा वावर हा येथील पाणजे व डोंगरी खाडी किनारी आहे. याच परिसरातून विजेच्या उच्च दाबाच्या विद्युत तारा जातात.  त्यावेळी यातील काही पक्षी हे या तारांवरून उड्डाण करतात. त्यांचा स्पर्श या तारांना झाल्यानंतर धक्का लागून पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही झालेल्या आहेत.