रोगास कारणीभूत ठरणारा फॉर्मलडिहाइड कारखान्यांच्या धुरावाटे हवेत

वाढत्या प्रदूषणाच्या पाश्र्वभूमीवर खारघरवासीयांवर कर्करोगाची टांगती तलवार आहे. फॉर्मलडिहाइड या वायूचे प्रमाण खारघर परिसरात सामान्य पातळीच्या अडीच पट असल्याचे तेथील रहिवाशांच्या पुढाकाराने ‘इक्विनॉक्स लॅब’ ने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या वायूमुळे कर्करोग होऊ शकतो, असे ‘डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ आणि ‘अन्न औषध प्रशासना’चे म्हणणे आहे. या परिसरात पीएम २.५ आणि १० या प्रकारातील धूलिकणांचे प्रमाणही मोठे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र हा अहवाल चुकीचा वाटतो, असे म्हटले आहे.

खारघर परिसराच्या जवळच तळोजा औद्योगिक वसाहत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा आहे. त्यामुळे येथे प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे खारघरवासीयांनी स्वतच पुढाकार घेऊन इक्विनॉक्स प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांच्या मदतीने हवेचे नमुने घेतले. त्यात आढळलेल्या वायूंमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालानुसार खारघरमध्ये रात्री ‘फार्मलडायहाइड’ची पातळी सामान्य पातळीच्या अडीच पट असते. अशा हवेत सतत राहिल्यास कर्करोग होऊ शकतो, असा दावा ‘डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने केला आहे. वायू कोणत्या कारखान्यातून येतो, हे स्पष्ट झालेले नाही.

खारघरमधील रहिवाशांनी मागील महिन्यात एमपीसीबीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. हवेतील विविध घातक वायूंचे प्रमाण दर्शविणारी यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली होती, मात्र नागरिकांची ही मागणी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्राचा हवाला देऊन उडवून लावली होती. त्यामुळे मंगेश रानवडे व काही खारघरमधील काही रहिवाशांनी पुढाकार घेऊन हवेचे सर्वेक्षण केले. त्यासाठी त्यांनी ‘वुई नीड क्लीन एअर’ हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून कोणत्या परिसरात रात्री दर्प येतो याची माहिती एकत्र केली.

३१ ऑक्टोबरला रात्री साडेअकरानंतर हवेतील प्रदूषकांची तपासणी इक्विनॉक्स लॅबच्या प्रतिनिधींच्या मदतीने करण्यात आली. ‘सफर’ या संस्थेच्या मोबाइल अ‍ॅपचेही साहाय्य घेण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनीही आपल्या भागातील प्रदूषण अ‍ॅपच्या साहाय्याने कळवले. खारघर सेक्टर ३५ येथील आर.ए.एफ.च्या प्रवेशद्वाराच्या परिसरातील वायू घटकांची तपासणी करण्यात आली.

अहवाल ३ ऑक्टोबरला नागरिकांच्या हाती पडल्यानंतर ते अवाक झाल्याचे रानवडे यांनी सांगीतले. त्यात पी.एम. २.५चे प्रमाण १२२ एवढे आढळले. या कणांचे प्रमाण ६०  पर्यंत असल्यास ते घातक ठरत नाही, मात्र त्यापेक्षा अधिक झाल्यास त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. पी. एम. १० धूलिकणांचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळले. फॉर्मलडिहाइड या वायूचे प्रमाण हवेत १ पीपीएमपर्यंत असल्यास त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नाही, मात्र तपासणीत ते या प्रमाणाच्या अडीच पट असल्याचे स्पष्ट झाले.

फोर्मलडायहाईडचे २ पीपीएम (पार्ट पर मिलीयम) हे सतत मानवी शरीरात गेल्यामुळे नाक, फुफ्फूस व जठराचा कर्करोग होतो असे डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रीव्हेनशन व अन्न औषध प्रशासन या संस्थांनी स्पष्ट केले आहे. औषधनिर्मिती व्यवसायाशी संबंधीत उद्योगांमध्ये वायूचा वापर होतो. प्रमाणापेक्षा जास्त वायू सतत शरीरात गेल्यास तो घातक ठरू शकतो, असे पनवेल ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी अधिक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी सांगितले.

अन्य आजारांचीही भीती

* पीएम २.५, पीएम १० हे सूक्ष्म धूलिकण श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसात जळजळ, शिंका, नाक वाहणे, धाप लागणे अशा तक्रारी वाढतात. तसेच हृदयाशी संबंधित आजार, दमा, फुफ्फुसांचा कर्करोग अशा समस्यांमध्ये चारपटीने वाढ होते. फॉर्मलडिहाइड या वायूमुळे त्वचारोग, डोळ्यांचे आजार, थकवा व रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासारखे अनेक आजार होतात. रहिवाशांनी केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष ‘सफर’ च्या निष्कर्षांशी मिळतेजुळते असल्याचे रानवडे यांनी सांगितले.

*  खारघर वसाहतीच्या पूर्वेला तळोजा औद्योगिक वसाहत आहे. ५० टक्क्यांहून अधिक रासायनिक कारखाने असलेल्या तळोजा वसाहतीला अद्याप ‘लाल क्षेत्र’ जाहीर केलेले नाही. खारघर वसाहतीच्या दक्षिणपूर्व दिशेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे डोंगर फोडणे व जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे. खारघरमध्येही मोठय़ा प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्याचाही परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

‘सफर’ आणि इक्विनॉक्स लॅबसारख्या नामांकित प्रयोगशाळेच्या अहवालावर विश्वास ठेवून सरकारने खारघरला संवेदनशील क्षेत्र जाहीर करावे. त्यामुळे किमान रासायनिक कारखान्यांतील वायू शुद्धीकरणाचे नियम कडक होतील.

-मंगेश रानवडे,  सामान्य नागरिक

हा अहवाल चुकीचा वाटतो. वाहतुकीमुळे पीएम २.५ पेक्षा पीएम १० जास्त आहे, मात्र पीएम २.५ व पीएम १० मुळे कर्करोग होतो असे म्हणणे अयोग्य ठरेल. कर्करोग कशामुळे होतो याचा शोध लागलेला नाही. प्रदूषण मोजणाऱ्या यंत्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

– अनिल मोहेकर, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी