राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव शुक्रवारपासून सुरू होत असताना कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एकमेव मार्ग असलेल्या शीव-पनवेल महामार्गावर सानपाडा, तुर्भे, जुईनगर, बेलापूर  आणि शिरवणे या भागातील रस्ते आजही जर्जर झाले आहेत. ही डागडुजी थोडय़ाशा पावसाने उद्ध्वस्त होत असल्याने या रस्त्याची दुर्दशा कायम आहे. हा रस्ता कोणी दुरुस्त करावा यावर बराच काळ वाद सुरू होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यंतरी तो दुरुस्त केला होता, मात्र पुन्हा त्यावर खड्डे पडले आहेत.

मानखुर्द ते कंळबोली या २३ किलोमीटरच्या शीव-पनवेल महामार्गाचे चार वर्षांपूर्वी एक हजार २०० कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण करण्यात आले आहे. या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी कामोठे येथे असलेल्या टोलनाक्यावर टोलमाफी देण्यात आल्यापासून रस्त्याच्या कंत्राटदार कंपनीने हात वर केले आहेत. त्यामुळे वाशी ते कळंबोली दरम्यान उभारण्यात आलेल्या सहा उड्डाणपुलांवर खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक मोठे अपघात झाल्याने रस्ते बांधकाम कंपनीवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली होती, मात्र ही दुरुस्तीही मागील आठवडय़ात झालेल्या पावसात वाहून गेली. त्यामुळे पनवेलकडे जाताना तुर्भे उड्डाणपुलाच्या खाली, जुईनगर रेल्वे स्थानकासमोर आणि शिरवणे व सीबीडी उड्डाणपुलांवरील खड्डय़ांचे शुक्लकाष्ठ कायम आहे. त्यामुळे गुरुवारी कोकणात जाणाऱ्यांची वाहने या भागातून धीम्या गतीने जात होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

शीव-पनवेल महामार्गावरील हे रस्ते विघ्न कायम असताना पालिका क्षेत्रातील अंर्तगत रस्त्यांवरही तिच स्थिती आहे. तळवली नाक्यावरून गोठवलीमार्गे जाणाऱ्या एका सेवा रस्त्याची तर चाळण झाली आहे.

हीच स्थिती सानपाडा गावात जाताना लागणाऱ्या तुर्भे उड्डाणपुलाखालील रस्त्याची आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून रस्ते मिशनच्या नावाखाली काँक्रिटीकरण करणाऱ्या पालिकेचे या मुख्य अंर्तगत रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.