गतवर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषणात घट, नवी मुंबईत ३३,२२६ गणेशमूर्तीचे विसर्जन

नवी मुंबई महापालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाने केलेली चोख व्यवस्था आणि गणेशमंडळांनी नियमांचे केलेले काटेकोर पालन यामुळे अनंत चतुर्दशीला गणरायांना शांततेत आणि शिस्तबद्ध निरोप देण्यात आला. नवी मुंबई महापालिका व पोलीस उपायुक्त परिमंडळ १ क्षेत्रात तब्बल ३३ हजार २२६ गणरायांचे तर पनवेल पालिका, उरण या पोलीस परिमंडळ २ विभागात तब्बल ४७ हजार ७९० गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशे व लेझिमच्या तालावर गणरायांना पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घालत निरोप देण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वाहतूक पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३ विसर्जन स्थळांवर विसर्जनाकरिता तराफ्यांची व मोठय़ा मूर्तीसाठी फोर्क लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेसाठी काठांवर बांबूंचे कठडे उभारण्यात आले होते. वीज आणि जनित्रांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ७२४ स्वयंसेवक नेमण्यात आले होते. तसेच अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षक तैनात होते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही वाशीतील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. कोपरखैरणेत काही वेळ विसर्जन मिरवणुकांतील वाद्यांबाबत पोलीस व भाविकांत बाचाबाची झाली. परंतु शहरातील विसर्जन अतिशय आनंदात व विनाविघ्न पार पडल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनीही शांततेत विसर्जन झाल्याचे सांगितले.

ध्वनिक्षेपक, डीजेचे प्रमाण नगण्य

यंदा गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांतील ध्वनिक्षेपकावर दरवर्षीच्या तुलनेत बरीच मर्यादा आली. न्यायालयाच्या डीजे बंदीचे कटकोरपणे पालन करीत मंडळांना डीजे वादनासाठी परवानगी नाकारण्यात आली होती, असे नवी मुंबई पोलिसांच्या ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. बहुतेक मंडळांनी ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर मिरवणुका काढल्या. अनंत चतुर्दशीआधी डीजेवरील बंदी उठवली होती, मात्र मुरवणुकीत बहुतांश मंडळांनी ढोल-ताशाच वापरला. ज्यांनी डीजे लावला होता त्यांच्या आवाजावर पोलिसांनी मर्यादा घातल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. यंदा ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ गणेशोत्सव मंडळे पोलिसांच्या रडारवर आहेत. यापैकी वाशीतील ९ तर तुर्भे येथील ५ मंडळांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

निर्माल्य संकलनाला चांगला प्रतिसाद

पाने, फुले यांचे विघटनशील निर्माल्य आणि मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक, थर्माकोल असे सुके निर्माल्य गोळा करण्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश प्रत्येक विसर्जनस्थळी ठेवण्यात आले होते. त्यात तब्बल ७७.३९० टन निर्माल्य गोळा झाले. गेल्यावर्षी हे प्रमाण ६५ टन एवढे होते. विघटनशील निर्माल्यापासून तुर्भे येथे खत तयार करण्यात येणार आहे. निर्माल्याच्या वाहतुकीसाठीही सर्व विसर्जनस्थळांवर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी आणलेली फळे व अन्य खाद्यपदार्थ स्वयंसेवकांमार्फत वेगळे ठेवण्यात आले. त्यांचे निराधार व गरजूंना वाटप करण्यात आले.

पोलीस परिमंडळ दोनमध्ये अतिशय शांततेत विसर्जन सोहळा पार पडला. गणेशभक्तांनी आनंदाने गणरायाला निरोप दिला. कोणताही तणाव अथवा अनुचित प्रकार पनवेल, उरण परिसरात घडला नाही.

राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ २