नळांमधील पाणी दाब नियंत्रित करणारे उपकरणाचे वाशी येथे वाटप
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करताना त्यात ८० टक्के पाणी हे केवळ नळात उच्च दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे वाया जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घरातील सर्व नळांना जर्मनीच्या एका कंपनीने बनविलेले दाब नियंत्रित उपकरण लावल्यास पाण्याची फार मोठय़ा प्रमाणात बचत होऊ शकते, असे दिसून आले आहे.
वाशी येथील एका नगरसेविकेने पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी २०० रुपयांना येणारे हे नळाचे साहित्य स्वखर्चाने प्रभागात काही मतदारांना वाटप केल्याने पाणीबचतीचा एक नवीन उपाय तयार झाला आहे. राज्यात पाणीटंचाईने हतबल झालेल्या सर्व पालिका, नगरपालिका क्षेत्रांनी नळाच्या तोंडाशी हे छोटेसे उपकरण बसविल्यास पिण्याच्या पाण्याची होणारी ओढाताण काही अंशी थांबण्यास हातभार लागण्याची शक्यता आहे.
सकाळी उठल्यावर साधे तोंड धुण्यास गेल्यानंतर बेसिनमधील नळाचा दाब पाहता वापरण्यात येणारे पाणी एक लिटर असेल तर त्या जोराच्या दबावामुळे वाया जाणारे पाणी हे चार लिटर असल्याचे दिसून येते. हीच स्थिती दिवसभरात बेसिनमध्ये हात धुणाऱ्या गृहिणीची, तर काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची आहे. दिवसातून अनेक वेळा बेसिनमध्ये हात धुणाऱ्या गृहिणीच्या एका सर्वेक्षणानुसार १२ लिटर पाणी वाया जात असल्याचे आढळून आले आहे. आपल्या हातावर पडणाऱ्या पाण्याचा वेग नियंत्रित केल्यास पाण्याची फार मोठी बचत होत असल्याचे दिसून येते.
जर्मन येथील नियोर्पर या कंपनीने बनविलेले हे उपकरण देशातील रिलायन्स, इन्फोसिससारख्या बडय़ा कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कार्यालयातील सर्व नळांना बसवून घेतले आहे. यामुळे बेसिनमध्ये हातावर मोठय़ा वेगाने पडणारे पाणी हे हळुवार पडत असून यामुळे हात धुण्यास थोडा जास्त वेळ लागत आहे; पण पाण्याची मोठय़ा प्रमाणात बचत होत असल्याचे दिसून आले आहे. नळांच्या उद्योगात अग्रगण्य असलेल्या एका बडय़ा कंपनीने हे उपकरण कायमस्वरूपी बसवून ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे, मात्र सर्वसामान्य नागरिकापर्यंत या उपकरणाची माहिती झालेली नाही. सिंगापूर हे एक बेट असल्याने पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत त्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे खूप मोठय़ा प्रमाणात त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आयात करावी लागते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सिंगापूर सरकारने या पाणी दाब नियंत्रित उपकरणाची जोडणी स्वखर्चाने केली. त्यासाठी एका दिवसात ३०० प्लंबर नियुक्त करण्यात आले. त्यांनी घरोघरी जाऊन मोफत हे उपकरण सर्व नळांना त्यांच्या आकारानुसार लावून दिले. त्यामुळे सिंगापूरमध्ये पाण्याची करावी लागणारी आयात पन्नास टक्के कमी झाली.
शहरातील सर्व हॉटेलमालकांनी हे उपकरण बसवून घेणे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे पालिकेचे मुख्यालय, प्रभाग कार्यालय, सर्व शाळा, रुग्णालय या सार्वजनिक ठिकाणच्या नळांना हे उपकरण बसविल्यानंतर पाणीबचतीचा एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. सानपाडा येथील एका सोसायटीने हे उपकरण सक्तीचे केले असून सर्व घरातील नळांना बसविण्यात आले आहे. नेरुळ येथे नव्याने सुरू होणाऱ्या एका रुग्णालयाने हे उपकरण अगोदरच बसवून घेतले आहे.

अत्यंत छोटे आणि बोटाच्या टोकावर बसणारे हे उपकरण नळांच्या आकारमानाप्रमाणे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे बेसिन, शॉवर यासाठी हे वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध आहेत. नुकतीच सिंगापूरला भेट देऊन आलेल्या वाशीतील एक नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी हा प्रयोग आपल्या प्रभागात स्वखर्चाने केला. त्यासाठी जर्मनीच्या त्या कंपनीला संपर्क साधून त्यांच्या राज्यातील वितरकांशी संवाद साधला. त्यानंतर या अधिकाऱ्यांचे एक शिबीर नागरिकांना या उपकरणाचा वापर किती महत्त्वपूर्ण आहे ते समजावून सांगण्यासाठी आयोजित करण्यात आले. घरात दिवसभर केवळ हात धुण्यासाठी लागणाऱ्या एकूण पाण्यातील ८० टक्के पाणी वाया जात असल्याचे उदाहरणासह पटवून देण्यात आले. त्यामुळे वाशी सेक्टर सहा-सातमधील काही नागरिकांनी नळात ही उपकरणे बसवून घेण्यास सुरुवात केली आहे. मंदगतीने हातावर पडणाऱ्या या पाण्यामुळे हात धुण्याचा हेतू साध्य होत आहे आणि त्यामुळे पाण्याचा वापरही कमी होत आहे.