घाऊक, किरकोळीत  ३० ते ४० रुपयांची वाढ

नवी मुंबई गेल्या काही महिन्यांपासून भाज्यांचे दर चढेच असून दररोज लागणारे आलेही महागले आहे. आवक कमी झाल्याने गेल्या महिन्यात ८० ते १०० रुपये किलो असणारे आले आता किरकोळ बाजारात दीडशे तर घाऊक बाजारात ८० रुपयांवर गेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेतही ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या पावसाळा सुरू झाला असून या थंडगार वातावरणात नागरिक आले घातलेला गरमागरम फक्कड चहा पिण्यास पसंती देतात. तर गृहिणी प्रत्येक भाजीमध्ये आले वापरतात. बहुगुणी आले औषधीसाठीही महत्त्वाचे असल्याने ३६५ दिवस आल्याला मागणी असते.

जून महिन्यात आल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत अशी माहिती व्यापारी कैलास तांजणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यंदा कमी उत्पादन झाले असून परिणामी आवक घटली आहे. सध्या घाऊक बाजारात १ ट्रक व २० टेम्पो आले दाखल होत आहे. घाऊक बाजारात आले प्रतिकिलो ७० ते ८० रुपये तर किरकोळ बाजारात १५० रुपयांवर पोहोचले आहे.

टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपयांवर असलेले टोमॅटो आता ४० रुपयांवर तर घाऊक बाजारात २८ ते ३० रुपयांवरून २० ते २२ रुपयांवर आले आहेत.

बाजारात आले दिसेना

घाऊक बाजारात आवक कमी होत असून दरही वाढले आहेत. त्यामुळे किरकोळीत अद्रक दिसेनासे झाले आहे. किरकोळीत आल्याने दीडशे गाठली असून भाजी मंडईत प्रमाण कमी दिसत आहे. गृहिणींना छटाकभर आल्यासाठी फिरावे लागत आहे.