मुंबई-गोवा महामार्गावर त्याने अपघातांत शेकडोंचे प्राण वाचवणाऱ्या कोकणच्या सुपुत्राचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी समाज म्हणून त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मनोगत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रवींद्र मुळीक यांच्या शोकसभेत व्यक्त केले. कळंबोली येथील शेल कंपनीच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणारे मुळीक हे महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष होत. नुकतेच त्यांचे मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती निधन झाले. कळंबोलीमध्ये मुळीक यांच्या शोकसभेत मंत्री केसरकर उपस्थित होते, त्या वेळी केसरकर म्हणाले की, १३ वर्षांपूर्वी मुळीक यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यांनी पुराच्या घटने वेळी, आग लागलेल्या घटनच्या वेळी आणि महामार्गावरील अनेक वाहनांच्या अपघाताच्या वेळी स्वत:ला व आपल्या संस्थेतील सदस्यांना झोकून देऊन अनेकांचे प्राण वाचवले. ‘यशदा’मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर कोकणसमवेत राज्यभरात व परराज्यातही त्यांनी जिल्हापातळीवरील सरकारी कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊन त्यांना आपत्तीच्या वेळी दोन हात कसे करावे हे शिकवले.
मुळीक यांच्या पश्चात त्यांच्या संस्थेने सुरू केलेली चळवळ जिवंत राहावी यासाठी आणि त्यांचे कुटुंबीयांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे मी सरकारदरबारी नक्की पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. या वेळी असंख्य कळंबोलीवासीय व मुळीक यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.