ग्राहकांची फसवणूक; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात सध्या हापूसबरोबर कर्नाटकी आंबाही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मात्र याचा फायदा काही किरकोळ विक्रेते उचलत असून हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबे एकत्रित करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. घाऊक व्यापाऱ्यांकडे ग्राहक याबाबत तक्रारी करीत आहेत. असे असतानाही अन्न व औषध प्रशासनाने अद्याप एकही कारवाई केलेली नाही.

एपीएमसीच्या फळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात कोकणामधील हापूस आंबा दाखल होत आहे. त्याचबरोबर कर्नाटकी आंब्याचीदेखील आवक सुरू आहे. यंदा हवामान बदलामुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली असून त्याच्या दर्जावरही परिणाम झालेला  आहे. त्यामुळे बाहेरून दिसताना हापूस व कर्नाटकी आंबा एकसारखा दिसत आहे. याचा फायदा घेत काही विक्रेते हे हा प्रकार करीत आहेत.

व्यापाऱ्यांकडून हापूसची खरेदी करीत किरकोळ विक्रेते हे फिरतीवर हापूसच विक्री करीत असतात. यासाठी ते फेरीवाल्यांची मदत घेतात. त्यांना पेटीमागे दलाली दिली जाते. हे विके्रते ही पेटी भरताना खाली कर्नाटकी आंबा आणि वर हापूसच्या आंब्याचा थर लावतात. त्यामुळे पेटी उघडल्यानंतर ग्राहकाला हे समजत नाही.  सध्या बाजारात १६६५ क्विंटल हापूस आवक होत आहे, तर कर्नाटक आंब्याच्या दोन गाड्या आवक सुरू आहे.

ग्राहकांची फसवणूक सुरू झाली असून फळ बाजारात येणारे ग्राहक तशी विचारणा व्यापाऱ्यांना करीत आहेत. असे असताना अन्न व औषध विभागाने किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांकडून विक्री होणाऱ्या हापूसची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अद्याप या वर्षात एकही कारवाई करण्यात आलेली नाही. अधूनमधून अशी कारवाई झाल्यास यावर काही निर्बंध येतील, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाने याबाबत नियोजन केले आहे. लवकरच अधिकारी बाजारात जाऊन पाहणी करतील. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -आर. यू .जाधव, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

 

आमच्याकडे आलेले ग्राहक बोहरे फसवणूक होत असल्याने चोखंदळपणे चौकशी करून हापूस खरेदी करीत आहेत. कर्नाटकी आंबे नसल्याची खात्री झाल्यानंतरच ते खरेदी करतात. – संजय पिंपळे, व्यापारी, एपीएमसी

 

फरक असा ओळखा

  •  हापूस हा पूर्ण परिपक्व होतो तेव्हा आतून केशरी होतो तर कर्नाटकी आंबा पिवळा दिसतो.
  •  कच्चा हापूस हा हिरवा गर्द असतो, तर कर्नाटकी आंबा थोडा लालसर.