नवी मुंबईतील चित्रपटगृहांच्या आतही पोलीस, सुरक्षा रक्षक तैनात

राज्यभर  वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने गुरुवारी नवी मुंबईतील सर्व चित्रपटगृहांबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकही पोस्टर चित्रपट गृहांबाहेर लावण्यात आले नाही.

कोपरखैरणेतील एकमेव असलेल्या बालाजी चित्रपटगृहात पोलिसांचा फौजफाटा होता. एकूण १५ ते २० पोलीस कर्मचारी तैनात होते. या चित्रपटगृहात चार पडदे आहेत. चित्रपट सुरू होताच प्रत्येक दालनात एक पोलीस कर्मचारी व चित्रपट गृहातील प्रत्येकी एक सुरक्षा रक्षक यांचा पहारा ठेवण्यात आला. प्रेक्षकांची कसून तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांकडील कंपास पेटी,

ब्लेड, परफ्युम, पाणी, डब्ब बारकाईने तपासण्यात आले.  पहिल्या दिवशी चित्रपटाला अल्प प्रतिसाद होता, अशी माहिती चित्रपटगृह कर्मचाऱ्यांनी दिली. सुट्टीत प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

चोख सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास ती काढून घेऊनच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे.चित्रपटगृहातही सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आठवडाभर सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.

रंजना रणविकर, सुरक्षा रक्षक