पनवेल शहर रस्त्यालगत दुकानदारांनी वाढवलेली बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पनवेल नगरपालिकेने सुरू केली आहे. येत्या दहा दिवसांत अशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात येतील. मात्र भविष्यात पुन्हा बेकायदा बांधकामे उभी केल्यास अतिक्रमण पाडण्याचा आणि पोलीस बंदोबस्ताचा खर्च संबंधित दुकानदारांकडून वसूल केला जाणार आहे. तशा नोटिसा दुकानदारांना बजावण्यात आल्या आहेत. ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल’ अशी संकल्पना नगरपालिकेने राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी या वेळी बोलताना दिली.

‘मार्जिनल’ची मर्जी
व्यापारी वर्गाने पनवेलला बकाल स्वरूप आणले. मार्जिनल जागेवर आपलीच मर्जी राहील, याची खबरदारी दुकानदारांनी घेतली. याला काही राजकीय नेत्यांचाही वरदहस्त होता. दुकानासमोर पत्र्याच्या शेड, कठडे आणि भिंती चढविण्यात आल्या. नागरिकांना चालण्यासाठीचा पदपथ या बांधकामांनी गिळंकृत केला. शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली. १५ दिवसांचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे नियोजन करण्यात आले. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई झाली.

बेकायदा बांधकामे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडपासून ते भाजीमार्केट रस्त्यालगतची दुकाने
* कोळीवाडा येथील रस्त्यावर बसणारे मासळीविक्रेते टपालनाकावरील दुकानदारांसह वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाने थाटलेले बेकायदा बांधकाम
* शिवाजी चौक ते पंचरत्न हॉटेलपर्यंत ते एमजी रोड