गेली तीन वर्षे पूरस्थिती निर्माण होत असल्याने डुंगी ग्रामस्थांचा निर्धार

नवी मुंबई : विमानतळासाठी करण्यात आलेल्या आठ मीटर उंचीच्या भरावामुळे बाधित झालेल्या गावांचा विचार केला जात नाही. त्यामुळे गेली तीन वर्षे नियोजित विमानतळाचे शेजारी असलेल्या डुंगी गावात पाणी साचून लोकांचे जगणे मुश्कील होत आहे. तरीही सिडको या दरवर्षी होणाऱ्या ग्रामस्थांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता पुनर्वसन न झाल्यास जलसमाधी घेऊ, असा निर्धार डुंगी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

शनिवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने सोमवापर्यंत डुंगी गावात दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे चित्र होते.

नामकरणावरून हजारोचे मोर्चे काढणाऱ्या प्रकल्पग्रस्त संघटना मात्र विमानतळामुळे पाण्यात गेलेल्या डुंगी गावातील १२६ ग्रामस्थांसाठी झगडताना दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढे होऊन सिडकोला इशारा दिला आहे.

गेली तीन वर्षे या गावात पाच ते सहा फूट पाणी संततधार पाऊस झाल्यावर भरत आहे. १०० वर्षांचा विचार करून बांधण्यात येणाऱ्या या ग्रीनफील्ड विमानतळाच्या कुशीत पाणी साचत असल्याने सिडकोने दोन वर्षांपूर्वी या भागाचा पुन्हा सर्वेक्षण केले. त्यानंतर ४६ घरांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १२६ कुटुंबात ३५० पेक्षा जास्त ग्रामस्थ राहात आहेत. दरवर्षी होणारा गणेशोत्सव ते या चार फूट साचलेल्या पाण्यात साजरा करीत आहेत. गावातील तरुण पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांतून मार्ग काढत आहेत.

रात्रभर जागरण

ग्रामस्थ पाणी केव्हाही साचेल या भीतीने रात्रभर जागत आहेत. त्या सर्व ग्रामस्थांचे सिडकोने विमानतळ प्रकल्पग्रस्ताप्रमाणे पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असल्याचे मत माजी सरपंच आदेश नाईक करीत आहेत. सर्वाचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत गाव सोडणार नाही, मग भले याच ठिकाणी पावसात जलसमाधी लाभली तरी हरकत नाही, अशी भूमिका या ग्रामस्थांच्या वतीने नाईक मांडत आहेत.