पनवेल : पनवेल तालुक्यातील मुख्य नदींपैकी एक असणाऱ्या गाढी नदीपात्रात विचुंबे गावालगत जलपर्णीचा विळखा बसला आहे. सुमारे काही किलोमीटर हा विळखा घट्ट बसल्याने जलपर्णीचा गालिचा नदीपाण्यावर पसरविल्याचे चित्र आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी सरकारच्या कोणत्याही प्रशासनाने हालचाली केलेल्या नाहीत. कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना या जलपर्णीचे दर्शन होते.

मागील वर्षी पनवेलच्या तत्कालीन तहसीलदारांनी हे नदीपात्र स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला होता. आकडे यांच्या बदलीनंतर नवीन तहसीलदार हे काम हाती घेतील का याकडे सामान्य पर्यावरणवाद्यांचे लक्ष लागले आहे.

गाढी नदीच्या एका किनाऱ्यावर पनवेल शहर वसले आहे. याच गाढी नदीला २००५ साली आलेल्या पुरामध्ये पनवेल शहराचा व सिडको वसाहतींचा काही भाग पाण्याखाली गेला होता. गाढी नदीचा उगम पनवेल तालुक्यातील पूर्व परिसरातील डोंगररांगांतून होतो. तसेच या नदीचे पाणी पुढे खाडीत विसर्जित होत असल्याने भरती-ओहोटीचा परिणाम या खाडीच्या नदीपात्रात पाहायला मिळतो. सध्या हीच गाढी नदी धोक्याच्या घंटेवर आहे. विचुंबे गावाच्या हद्दीतील गाढी नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्याने हा धोका अधिक वाढला आहे. पनवेलचे गट विकास अधिकारी डी. एन. तेटगुरे यांना याबाबत विचारल्यावर तत्काळ या प्रश्नी विचुंबे ग्रामपंचायतीला लेखी पत्राने कळवू असे सांगण्यात आले. मात्र नदी संवर्धनाकडे पंचायत समितीकडे सध्या तरी कोणतेही नियोजन व सरकारी निधी नसल्याचे पंचायत समितीच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. सामाजिक संस्था व निसर्ग प्रेमीसंस्थांना आवाहन करून मागील अनेक वर्षे पनवेलच्या नद्यांचे संवर्धन करण्याचा विचार सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी पनवेलमध्ये राजेंद्र सिंह जलतज्ज्ञांनी भेट देऊन नद्यांच्या संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याविषयी आवाहन केले होते. त्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा पुढाकार घेतला होता. त्यानंतर ही मोहीम पुन्हा थंडावली. पनवेलचे तत्कालीन तहसीलदार आकडे यांच्या प्रयत्नांनंतर त्यांच्या पदावर आलेले अमित सानप हे यासाठी काय प्रयत्न करतात याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे.