12 December 2017

News Flash

कर्नाटकी हापूस परदेशात लोकप्रिय

कोकण आणि कर्नाटक येथील हापूस आंब्याचा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे.

विकास महाडिक, नवी मुंबई | Updated: May 13, 2017 12:56 AM

कर्नाटकी हापूस

एकूण निर्यातीत ३५-४० टक्के वाटा

कोकणातील हापूस आंब्याच्या रोपांची लागवड कर्नाटकच्या हुबळी, धारवाड, बेळगाव, टुक्कूर आणि चणपटवा भागांत करून कोकणच्या हापूससारखेच उत्पादन घेण्यात आल्यामुळे कर्नाटकी हापूसची परदेशातील लोकप्रियता वाढली आहे. कोकणातील हापूस म्हणूनच विकला जाणाऱ्या हा आंबा मॉल आणि निर्यातीत भाव खाऊ लागला आहे. हापूस आंब्याच्या निर्यातीत यंदा कोकणच्या हापूसचे प्रमाण ६० टक्के असताना कर्नाटकच्या हापूसचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे.

कोकण आणि कर्नाटक येथील हापूस आंब्याचा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी १५ दिवस हा आंबा बाजारात आढळेल. पाऊस यंदा लवकर सुरू होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्या भीतीने कोकण आणि कर्नाटकचा हापूस आंबा लवकर बाजारात पाठविला जात आहे. सध्या वाशी येथील हापूस आंब्याच्या घाऊक बाजारात कोकणातून रोज हापूसच्या ६०-७० हजार पेटय़ा (प्रत्येक पेटी पाच ते सहा डझनांची) येत आहेत तर त्यापेक्षा थोडय़ा कमी म्हणजेच ४० ते ५० हजार पेटय़ा कर्नाटकमधून येत आहेत. त्यामुळे बाजारात एक ते सव्वा लाख पेटय़ा हापूस आंबा येत आहे. मागणी तसा पुरवठा होऊ लागला आहे. यात कर्नाटकमधील हापूस आंब्याने बाजी मारली असून चवीला हा आंबा कोकणातील हापूस आंब्यासारखाच आहे. सध्या बाजारात येणारा हापूस आंबा हा नैसर्गिकरीत्या परिपक्व झाल्याचे मानले जाते. दोन्ही हापूस आंब्यांची चव सारखीच आहे.

कर्नाटकी हापूस आंब्याची आवक यंदा पूर्वीपेक्षा वाढल्याने बाजारातील कोकणच्या हापूस आंब्याचे दर आटोक्यात राहिले आहेत, मात्र चांगल्या प्रतीचा निर्यातीच्या दर्जाचा हापूस आंबा हा बाजारात ४००-५०० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. खुल्या बाजारात हा दर आकाराप्रमाणे कोकण हापूससाठी १५०-४०० रुपये प्रति डझन आहे. हापूस आंब्याचा हा मोसम आणखी जेमतेम १५ दिवस राहणार आहे. यानंतर गुजरातमधील हापूस आंब्याची आवक सुरू होणार असून याच काळात राज्यात नव्याने उत्पादन घेणाऱ्या जुन्नर, आंबेगाव येथील हापूस आंबाही बाजारात काही काळ मिरवणार आहे.

First Published on May 13, 2017 12:53 am

Web Title: karnataka hapus mango popular in foreign